ओंकार कुलकर्णी, धाराशिव
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात पेट्रोलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पेट्रोल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून अमर शेख आणि गोळ्या साठे या दोघांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी थेट कोयता काढून कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पेट्रोल पंप परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
धाराशिवमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
विशेष म्हणजे,ही घटना सुमारे आठ दिवसांपूर्वी घडली होती.मात्र आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.सोशल मीडियावरही हे फुटेज वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.किरकोळ कारणावरून करण्यात आलेल्या या हिंसक हल्ल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नक्की वाचा >> Badlapur News: बदलापुरात डबल मर्डर, ओला चालक अन् महिलेसोबत काय घडलं? लहान मुलाच्या जबाबाने पोलिसही हादरले
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रांचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. घटनेमागचं नेमके कारण आणि आरोपींबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.