Mumbai News : महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'लाडकी बहीण' या योजनेचा हप्ता रक्षाबंधनाच्या सणापूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. राज्यातील हजारो महिलांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना एक प्रकारे सरकारी भेट मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. हा पहिला हप्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे रक्षाबंधनासारख्या महत्त्वाच्या सणासाठी महिलांना मोठा आधार मिळणार आहे.
(नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप)
रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलै महिन्याचा हप्ता 9 ऑगस्टपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण 746 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून, पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केले गेले आहे.
योजनेचा उद्देश आणि फायदा
'लाडकी बहीण योजने'चा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणे आहे. या योजनेमुळे महिलांना छोट्या-मोठ्या खर्चांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोठा फायदा होत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे.
(नक्की वाचा - Mumbai News: श्रीमंत महापालिकेची शाळा 1 महिन्यापासून बंद, 2 हजार विद्यार्थी वाऱ्यावर)
या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असताना, काही राजकीय टीकाकारांकडून "ही योजना बंद होणार" असा चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थी महिलांचा या योजनेवर ठाम विश्वास आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमता वाढली आहे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ऑगस्ट २०२५ मधे एक वर्ष पूर्ण होत आहे त्या धर्तीवर या योजनेतील प्राप्त निधीचा वापर, त्याचे परिणाम आणि महिलांमध्ये झालेला सकारात्मक बदल याचा सखोल अभ्यास करून सरकारने सदर योजनेची गरज का आहे? याबाबत प्रभावी अहवाल तयार करण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.