विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रभाव निवडणुकीत पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनाचा फटका बसू शकतो हे लक्षात येताच महाविकास आघाडीने त्याविरोधात गृहलक्ष्मी योजनेचं आश्वासन दिलं आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमाह 1500 रुपये मिळतात. तर गृहलक्ष्मी योजनेद्वारे महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं आहे.
मात्र भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी यांनी गृहलक्ष्मी योजनेवरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत बोलाताना म्हटलं की, “गृहलक्ष्मी योजनेत एका कुटुंबातील फक्त एका महिलेला लाभ दिला जातो. सासू, सून आणि नणंद यांच्यापैकी एकालाच या योजनेचा फायदा मिळतो, ज्यामुळे कुटुंबात वाद आणि स्पर्धा निर्माण होते.”
(नक्की वाचा- मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य)
या उलट महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना घरातील सर्व पात्र महिलांना लाभ देते. एखाद्या कुटुंबात तीन पिढ्यांच्या महिला असल्या तरी प्रत्येक महिलेला स्वतंत्र लाभ दिला जातो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्यासोबतच घरात सौहार्दही टिकून राहते.
(नक्की वाचा- "आमचं ठरलयं...", बारामतीत अखेरच्या क्षणी 'लेटर पॉलिटिक्स')
लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दोन कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे. एका घरातील एकापेक्षा जास्त महिलांना लाभ देऊन ही योजना महिलांच्या विविध गरजा पूर्ण करते. यामुळे महिलांना आत्मनिर्भरता मिळते आणि निर्णय घेण्याचा आत्मविश्वासही वाढतो, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाची जाणीव करून देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकाप्रमाणे एका घरातील फक्त एका महिलेला लाभ दिला जाईल, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.