जाहिरात

मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठ विधान केलं आहे. रविवारी संगमनेर तालुक्यातील साकुर येथे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला त्यांनी हजेरी लावली.

मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

सुनील देवांगे, शिर्डी

विधानसभा निडणुकीचा प्रचारासाठी अखेरची काही तास शिल्लक आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल समोर आलेलं नाही. सर्व पक्षांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना भावी मुख्यमंत्री म्हणत आहे. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे. शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत.  

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठ विधान केलं आहे. रविवारी संगमनेर तालुक्यातील साकुर येथे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला त्यांनी हजेरी लावली. संगमनेर तालुक्यातील जनतेला संबोधित करताना सु्प्रिया सुळे यांनी म्हटलं की, तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं. अशी माझी देखील इच्छा आहे. तशी प्रार्थना मी शिर्डीच्या साईबाबांना आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला करते. 

बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. जे स्वप्न तुमच्या मनात आहे ते पूर्ण व्हावं, अशी माझी देखील इच्छा आहे. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याने बाळासाहेब थोरात भावी मुख्यमंत्री अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

"2029 ला इथलं तिकीट आम्ही बदलणार"

सुप्रिया सुळे यांनी पुढे म्हटलं की, मी आताच बाळासाहेबांच्या कानात सांगितलं 2029 ला इथलं तिकीट आम्ही बदलणार. तसेच जयश्रीला येथून तिकीट देणार असं देखील म्हटलं. मात्र कार्यकर्त्यांमधून 'दिल्ली दिल्ली' असा आवाज आल्यानंतर, तिला दिल्लीला घेवून जाते. मला पण सोबत होईल, असं सांगत जयश्री थोरातांच्या खासदारकीचे देखील संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले.

शरद पवार यांनी काय म्हटलं होतं?

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व देण्याचं वक्तव्य केलं होतं. ‘कृषीमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांचे काम आपण जवळून पाहिले आहे. आता त्यांच्या हातात राज्य दिले तर तर शेतीपासून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com