Palghar Crime News: पालघर पोलिसांनी सायबर गुन्हेगारीच्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लावला आहे. पालघर पश्चिमेतील माहीम परिसरात एका रहिवासी इमारतीमध्ये लपूनछपून चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, ते अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील (US) नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात होती. आरोपी विदेशी नागरिकांना विविध आमिषे दाखवून आर्थिक गंडा घालत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
रहिवासी इमारतीत चालत होता काळा धंदा
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 24 फेब्रुवारी 2026 रोजी माहीम परिसरातील सुंदरम शाळेजवळील 'फिया एकांत बिल्डिंग' (रूम नं. 303) येथे ही रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा- Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)
छाप्यात लाखो रुपयांचे साहित्य जप्त
छाप्यात 5.72 लाख रुपये किमतीचे 4 लॅपटॉप, 12 मोबाईल फोन, 4 हेडफोन, राउटर व डोंगल जप्त करण्यात आले असून, यामध्ये भरत लोकू लालवानी, रोहित राजेंद्र निंबाळकर, रोहित मिलिंद झोन्हे, अमरदीप अंग्रेज गिल आणि सागर बलदेव पाठडिया पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे.
फसवणुकीची 'हायटेक' पद्धत
आरोपी स्वतःला मायक्रोसॉफ्ट किंवा अॅपल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून “डिव्हाइस व्हायरसग्रस्त आहे” अशी भीती दाखवत. त्यानंतर Lawes, Apple, Nike, Amazon गिफ्ट कार्डच्या माध्यमातून किमान 500 ते 4000 अमेरिकन डॉलर उकळून ती रक्कम यूएसडीटीमध्ये रूपांतरित करून हवाला मार्गे रोख स्वरूपात मिळवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
(नक्की वाचा- Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)
या प्रकरणी पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 51/2026 दाखल करण्यात आला असून पाचही आरोपींना अटक करून 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून आणखी मोठा सायबर रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world