प्रतिनिधी, सूरज कसबे
Pune News : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीने आता अत्यंत रंजक आणि नाट्यमय वळण घेतले आहे. रविवारी रात्री पुण्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडल्या. काल रात्री ८:३० वाजल्यापासून मध्यरात्री दीड वाजेपर्यंत तब्बल ५ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखेर महायुतीकडून विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने आधीच श्रीकांत पाटील यांना मैदानात उतरवल्यामुळे आता पुण्यात थेट विक्रम काकडे विरुद्ध श्रीकांत पाटील म्हणजेच अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.
या जागेसाठी महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कमालीची चुरस होती. जिल्ह्यातील वाढलेली ताकद पाहता भाजप या जागेसाठी आग्रही होता, तर विद्यमान जागा म्हणून राष्ट्रवादी मागे हटायला तयार नव्हती. रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावरून जोरदार खलबते सुरू होती. बैठकीला माजी खासदार संजय काकडे स्वतः उपस्थित होते. जागावाटपाचा हा तिढा थेट मुंबईपर्यंत पोहोचला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोन कॉलने सर्व चित्र बदलले. फडणवीसांच्या ग्रीन सिग्नलनंतर ही जागा अजित पवार गटाला सोडण्याचे निश्चित झाले आणि विक्रम काकडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
कोण आहेत विक्रम काकडे?
महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे हे केवळ राजकीय वारसदार नसून त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे ते चिरंजीव आहेत. मात्र, राजकारणात ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे निष्ठावंत मानले जातात. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. विक्रम काकडे हे सलग ४ वर्षे महाराष्ट्राचे स्टेट शूटिंग चॅम्पियन राहिले आहेत. इटली, फ्रान्स, जर्मनी आणि थायलंडमधील आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता राजकारणाच्या मैदानात ते विरोधकांवर कसा निशाणा साधतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पुण्यातील एक आघाडीचे आणि नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणूनही त्यांचा दबदबा आहे.
कोण आहेत श्रीकांत पाटील ?
दुसरीकडे, शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुण्यात एक रंजक इतिहास जिवंत झाला आहे.
श्रीकांत पाटील हे पुण्याचे माजी महापौर वि. भा. पाटील यांचे सुपुत्र आहेत. १९७७ मध्ये वि. भा. पाटील याच मतदारसंघातून उभे होते. तेव्हा त्यांच्या विरोधात संभाजीराव काकडे निवडणूक लढवत होते. त्याकाळी तरुण असलेल्या शरद पवारांनी वि. भा. पाटील यांना ताकद दिली होती आणि ते निवडून आले होते. तब्बल ४९ वर्षांनंतर वि. भा. पाटील यांचे चिरंजीव (श्रीकांत पाटील) निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतः ८५ वर्षांचे योद्धा शरद पवार मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी समोर पुन्हा काकडे (विक्रम काकडे) हेच आव्हान आहे. त्यामुळे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करणार का, या उत्सुकतेने पुणेकरांचा पारा वाढवला आहे.
आकड्यांचा खेळ महायुती की महाविकास आघाडी ?
या निवडणुकीत एकूण ८६७ मतदार (लोकप्रतिनिधी) कौल देणार आहेत. कागदावर महायुतीची ताकद प्रचंड मोठी दिसत आहे, तर महाविकास आघाडीचे संख्याबळ अत्यंत मर्यादित आहे.
महायुतीचे उघड वर्चस्व:
अजित पवार गटाचे ३४४ आणि भाजपचे ३०५ सदस्य मिळून महायुतीकडे स्पष्ट बहुमत दिसतेय. राष्ट्रवादी ३७० तर भाजप ३३३ मतांवर आपला दावा सांगत आहे.
महाविकास आघाडीची चिंता:
शरद पवार गट (१७), काँग्रेस (१९) आणि ठाकरे गट (११) मिळून महाविकास आघाडीकडे केवळ ४७ मते आहेत.
पक्षीय बलाबल काय ? महत्त्वाचे पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ३४४
भारतीय जनता पक्ष ३०५
शिवसेना (एकनाथ शिंदे)६८
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट १७
काँग्रेस १९
शिवसेना ठाकरे गट ११
एकूण लोकप्रतिनिधी मतदार : ८६७
संख्याबळाचा विचार केला तर विक्रम काकडे यांचे पारडे जड वाटते. मात्र, शरद पवार हे अनपेक्षित धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. महायुतीकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील आपली उमेदवारी मागे घेणार की करो या मरोच्या पवित्र्याने ही लढत लढणार ? अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत पुण्याचा बाजीगर कोण ठरणार ? याचा फैसला लवकरच होईल....!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world