यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Rail Update : भारतीय हवामान विभाग (IMD) कडून पुण्यासह पश्चिम, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहरात दुपारनंतर अचानक हवामानात बदल होत अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्य पेठांसह वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, कात्रज, स्वारगेट, मार्केट यार्ड, हडपसर, पुणे लष्कर, शिवाजीनगर, येरवडा आणि औंध या परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील काही तासांतही पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळू शकतात.
नक्की वाचा >> Dombivli News: स्टंटबाज तरुणांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात, डोंबिवलीतील मोठा गाव मानकोलीतील नवा व्हिडीओ व्हायरल
शेतकऱ्यांना देखील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.एकीकडे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा इशारा असताना, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने राज्यात दुहेरी हवामानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यात वीज कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. पुण्यातील वारजे परिसरात पावसाळी वातावरणात अचानक विज पडल्याचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. इमारतीच्या गॅलरीत उभ्या असलेल्या नागरिकाने हा थरारक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओमध्ये क्षणार्धात प्रचंड प्रकाशझोतासह वीज जमिनीवर कोसळताना दिसते. विजेचा आवाज आणि त्यानंतर निर्माण झालेला भीतीदायक क्षण स्पष्टपणे जाणवतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world