Lonavala News : ...तर पोलिसांची कारवाई निश्चित; कार अन् बुलेट घेऊन लोणावळ्यात येणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सुट्टीच्या दिवशी लोणावळ्यात मोठी गर्दी असते. मुंबई-पुणे या दोन्ही शहरांपासून लोणावळा जवळ असल्याने याला सर्वाधिक पसंती दिली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, प्रतिनिधी

Lonavala News : मुंबई-पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. सुट्टीच्या दिवशी लोणावळ्यात मोठी गर्दी असते. मुंबई-पुणे या दोन्ही शहरांपासून लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण ७० ते ८० किलोमीटरवर असल्याने याला सर्वाधिक पसंती दिली जाते. मात्र लोणावळ्यात येताना काही पर्यटक नियमांचं पालन करताना दिसत नाही. अनेकदा दारु पिऊन गाडी चालवली जाते. तर अनेकदा तरुणवर्ग बुलेटवरुन लोणावळा गाठतात. या बुलेटमधून सायलेन्सरचा मोठा आवाज येत असतो. अनेकदा मुलांना याचा आनंद वाटतो. मात्र यापुढे तुम्ही लोणावळ्यात येताना वाहतुकीच्या नियमांचा भंग करीत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं.  

लोणावळा शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकली, फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर लोणावळा शहर वाहतूक पोलिसांची कारवाई केली असून राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे नियम मोडणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.


नक्की वाचा - Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास अतिजलद होणार! अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

बुलेट राजांवर कारवाई...

शहरात प्रवेश करणाऱ्या तसेच शहरांतर्गत फिरणाऱ्या ९८ वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली असून सुमारे २ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळा शहरात अनेक बुलेट राजा कर्कश आवाजातील सायलेन्सर, बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्स, काळ्या काचा आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या बुलेट राजांना पोलिसांनी खाकीचा बडगा दाखवत कारवाईचा दणका दिलाय यावेळी पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता कारवाई थेट केली आहे. पर्यटकांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात नियमभंगामुळे नागरिक व पर्यटकांना होणारा त्रास वाढत होता. पोलिसांच्या या ठोस भूमिकेमुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत असून आता तरी शिस्त लागेल अशी प्रतिक्रिया उमटत आहे. यावेळी पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. ही मोहीम केवळ तात्पुरती मर्यादित नसून पुढील काळातही सातत्याने अशीच कारवाई सुरू राहणार आहे. नियम पाळा, वाहने सुरक्षित चालवा हा स्पष्ट संदेश पोलिसांनी बुलेट राजांना कारवाईतून दिला आहे.

Topics mentioned in this article