Pune News: आयटी पार्कमध्ये गॅस टंचाई! नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना

Pimpri Chinchwad News: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे हिंजवडीतील आयटी कंपन्यांच्या कॅफेटेरियावर परिणाम झाला आहे. अन्नाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याचे मेल पाठवले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हिंजवडी आयटी पार्क सध्या एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (Commercial LPG) तुटवड्यामुळे कंपन्यांच्या किचनमधील शेगड्या विझल्या असून, याचा थेट फटका हजारो आयटी कर्मचाऱ्यांना बसला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना चक्क स्वतःचा डबा आणण्याच्या सूचना दिल्या आहेत.  गॅस पुरवठा खंडित झाल्याने कॅम्पसमध्ये हजारो लोकांसाठी जेवण तयार करणे अशक्य झाले आहे.

फूड कोर्ट आणि कॅफेटेरिया ठप्प

गॅसअभावी कंपन्यांच्या फूड कोर्टमध्ये नियमित स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. यामुळे सध्या कॅफेटेरियामध्ये केवळ मोजकेच पदार्थ उपलब्ध आहेत. कार्यालयीन कार्यक्रम किंवा महत्त्वाच्या मीटिंगसाठी दिल्या जाणाऱ्या विशेष केटरिंग सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी काही कंपन्या बाहेरील किचनमधून जेवण मागवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते अपुरे पडत आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Iran War: परराष्ट्रमंत्र्यांच्या एका फोनमुळे मोठा दिलासा; 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून भारतीय जहाजांना परवानगी)

परराज्यातील कर्मचाऱ्यांचे हाल

'रिटर्न टू ऑफिस' (RTO) धोरणामुळे सध्या हजारो कर्मचारी कार्यालयात येत आहेत. पीजी (PG) किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आणि परराज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. सकाळी लवकर घरून निघणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी डबा तयार करणे किंवा बाहेरून विकत घेणे कठीण झाले आहे.

'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या 'फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज' (FITE) कडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. जोपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होत नाही आणि खाण्यापिण्याची आबाळ थांबत नाही, तोपर्यंत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (WFH) द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

(नक्की वाचा- फारुख अब्दुल्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला! लग्नसमारंभात गोळीबार; थरारक घटनेचा VIDEO समोर)

हॉटेल व्यवसायालाही फटका

केवळ आयटी पार्कच नव्हे, तर पुण्यातील हॉटेल व्यवसायालाही या व्यावसायिक एलपीजी टंचाईचा मोठा फटका बसला आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक छोटी हॉटेल्स आधीच बंद झाली आहेत किंवा त्यांनी किमती वाढवल्या आहेत.
 

Topics mentioned in this article