विधानसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. काही तासातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. मात्र राजकीय हालचालींना कालपासूनच सुरूवात झाली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आमदार फुटू नये यासाठी देखील सर्वच पक्ष काळजी घेत आहेत. कुणी हॉटेल बूक केले आहेत, तर कुणी चॉपर, प्लेन बूक केले आहेत. सर्वच पक्षांचे निकालानंतरचे मेगाप्लान तयार झाले आहेत.
कुणाचा काय आहे मेगा प्लान?
मतमोजणीच्या आधी सर्वच पक्षांचा धाकधूक वाढल आहे. सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष सर्व पर्यायांचा चाचपणी करताना दिसत आहेत. उमेदवारांना विजयाचं प्रमाणपत्र मिळताच मुंबईला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजयी उमेदवारांना लवकरात लवकर मुंबईत आणण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असतील. यासाठी पत्रांना चार्टड प्लेन, हेलिकॉप्टर बूक केले आहेत.
निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी कुणाला स्पष्ट बहुमत मिळेल देखील अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे बेरजेचं राजकारण इथे सर्वच पक्षांना सुरु केले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे काल दिवसभर बैठकांचा सिलसिसा सुरु होता.
शिवसेना ठाकरे गटाची काय आहे तयारी?
उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मतमोजणीवेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसेच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केलं. टपाली आणि ईव्हीएममधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. लोकसभेत झालेल्या प्रकारानंतर ठाकरे गट सावध भुमिका घेत आहे.
काँग्रेसची तयारी
निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस काय पावले उचलणार? यासंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. निवडून आलेल्या आमदारांना तातडीने मुंबईत आणण्याची व्यूहरचना आखण्यात आली. त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यापासून ते निवडून आलेल्या आमदारांना इतर पक्षांपासून दूर ठेवण्याच्या रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाली. गरज पडल्यास काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना कर्नाटकातही पाठवू शकते, असे वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षही रणनीती आखताना दिसले. मतमोजणीदरम्यान गरज पडल्यास आक्षेप घेणे, मतदानाच्या आकडेवारीशी संबंधित फॉर्म 17C ची माहिती हे मुद्दे या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. यावेळी सरकार स्थापनेसाठी पक्षांना केवळ चार दिवसांचा अवधी मिळणार असल्याने मतमोजणीपूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.