Maharashtra Election Result 2026: महाराष्ट्रातील २९ पैकी २१ महानगरपालिकांवर महायुतीने कब्जा मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे भाजपने मित्रपक्षांच्या बालेकिल्ल्यातही शिरकाव करत राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक स्थान निर्माण केले आहे.
राज्यात महायुतीचा झंझावात
महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली आहे. भाजप-महायुतीने राज्यातील २९ पैकी २१ महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून एकहाती सत्ता काबीज केली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुर, संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
(नक्की वाचा- पुण्यात मोठी उलथापालथ! 4 पक्षांच्या शहराध्यक्षांना मतदारांनी नाकारले; 'प्रतिष्ठेच्या' लढतीत दिग्गजांची धूळदाण)
भाजपच्या या विजयाचे शिल्पकार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत भाजप केवळ स्वतः मजबूत झाला नाही, तर त्यांनी मित्रपक्षांच्या (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) पारंपरिक व्होट बँकेतही शिरकाव केला आहे.
एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात करिष्मा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे बालेकिल्ल्यात शिवसेनेचे वर्चस्व कायम राखले आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेने ७५ जागा जिंकून आपला गड राखला असला, तरी मुंबई आणि नवी मुंबईत हा शिंदेंची शिवसेना भाजपच्या तुलनेत मागे पडल्याचे दिसते. शहरी मतदार आता प्रादेशिक अस्मितेपेक्षा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अधिक विश्वास दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
(नक्की वाचा- Vasai Virar Election Results 2026: वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूरच 'किंग'; विजयाचा गुलाल मात्र फिका, कारण...)
भाजपकडून अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे पूर्वापार अजित पवारांचे अभेद्य गड मानले जात होते. मात्र, भाजपने या दोन्ही ठिकाणी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने विक्रमी १२३ जागा जिंकून राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. पिंपरी-चिंचवड येथेही भाजपने ८४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. या निकालांवरून राष्ट्रवादीची शहरी व्होट बँक आता भाजपच्या दिशेने सरकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
(नक्की वाचा- TMC Election 2026: ठाण्याचा 'गड' शिंदेंकडेच! महायुतीला निर्विवाद बहुमत; वाचा 131 नगरसेवकांची संपूर्ण यादी)
सत्तेचे नवे समीकरण
निवडणुकीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, महायुतीमध्ये सत्तेचे पारडे आता पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांतील विजयामुळे भाजप ही राज्याची एकमेव मुख्य राजकीय धुरी बनली आहे. शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना भविष्यात भाजपचे 'सहायक पक्ष' म्हणून राहावे लागते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. मतदारांनी प्रादेशिक नेत्यांपेक्षा मोदी-फडणवीस यांच्या स्थिर आणि केंद्रीकृत नेतृत्वावर अधिक शिक्कामोर्तब केले आहे.