महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेअंतर्गत निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यापासून कडक कारवाई करत अनेक जप्ती केल्या आहेत. अशाच एका कारवाईत, मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघात 1.43 कोटी रुपयांचे 1.95 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी ही माहिती दिली.
अवधूत नगर, दहिसर पश्चिम येथे नियमित तपासणी दरम्यान, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम ने 1.43 कोटी रुपयांचे 1.95 किलो सोने जप्त केले," असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(नक्की वाचा :रात्रीची पार्टी जीवावर बेतली, गजानन काळेंचा मृत्यू)
सोनं-चांदी आणि बेहिशेबी रोकड, ज्याचा उपयोग निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केला जाऊ शकतो, अशा अनधिकृत हालचालींना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने नियमित देखरेख ठेवून ही जप्ती करण्यात आली.
मुंबईत निवडणूक आयोगाने नुकत्याच केलेल्या आणखी एका कारवाईत, गोरेगाव येथील एसव्ही रोडवरील जैन मंदिराजवळ भरारी पथकाने 6 लाख 11 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आली आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका कारमधून टीमने 20 लाख रुपये जप्त केले होते.
(नक्की वाचा :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, डिव्हायडरला आदळल्यानंतर कार पेटली; महिलेचा मृत्यू)
महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या संहितेनुसार, 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड बाळगणाऱ्या लोकांकडे वैध कागदपत्रे असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपेपर्यंत आचारसंहिता लागू आहे. राज्यातील 288 विधानसभांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.