Maharashtra Election : बारामतीत पुन्हा 'पवार vs पवार'; काका-पुतणे विधानसभा निवडणुकीत आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये ही लढझत होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

रेवती हिंगवे, पुणे

लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबीय पुन्हा एकदा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. आता विधानसभा निवडणुकीतही बारामतीमधून काका-पुतणे आमने-सामने येणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबियांमध्ये ही लढत होणार आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार हे पवार कुटुंबातील निवडणूक लढवणारे सहावे सदस्य आहेत.

(नक्की वाचा-  Nandgaon Vidhan Sabha: नाशकात महायुतीचं 'बळ' घटलं, पुतण्याच्या बंडखोरीमुळे होणार वांदे!)

अजित पवार बारामती मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार आहे. बारामतीकरांनी अजित पवारांवर गेली अनेक वर्ष विश्वास दाखवला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत वारं फिरलं. अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. मात्र प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे बारामती म्हणजे अजित पवार या समीकरणाला काहीसा तडा गेला.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार नाहीत, अशा चर्चा देखील अनेकदा रंगल्या. अजित पवारांनी देखील बारामतीकरांवर उघड नाराजी व्यक्त केली. मात्र अखेर अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरले आहेत. आता त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोण आहेत युगेंद्र पवार? 

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील अध्यक्ष आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवार सक्रीय झाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार यांनी अख्खी बारामती पिंजून काढली. त्याचवेळी युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत बारामतीतून उमेदवार असतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. 

(नक्की वाचा -  महायुतीत पहिली बंडखोरी? माजी केंद्रीय मंत्र्याच्या समर्थकाने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची यादी

  1. जयंत पाटील - इस्लामपूर
  2. अनिल देशमुख- काटोल
  3. राजेश टोपे- घनसावंगी
  4. बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
  5. जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा 
  6. शशिकांत शिंदे - कोरेगाव
  7. जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
  8. गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
  9. हर्षवर्धन पाटील- इंदापूर 
  10. प्राजक्त तनपुरे -राहुरी
  11. अशोकराव  पवार- शिरुर
  12. मानसिंगराव नाईक- शिराळा 
  13. सुनील भुसारा- विक्रमगड 
  14. रोहित पवार- कर्जत जामखेड
  15. विनायकराव पाटील- अहमदपूर 
  16. राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
  17. सुधाकर भालेराव- उदगीर 
  18. चंद्रकांत दानवे- भोकरदन 
  19. चरण वाघमारे- तुमसर 
  20. प्रदीप नाईक- किनवट
  21. विजय भांबळे-जिंतूर 
  22. पृथ्वीराज साठे- केज 
  23. संदीप नाईक- बेलापूर 
  24. बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी 
  25. दिलीप खोडपे- जामनेर
  26. रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
  27. सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर 
  28. रविकांत बोपछे- तिरोडा 
  29. भाग्यश्री अत्राम- अहेरी 
  30. बबलू चौधरी- बदनापूर
  31. सुभाष पवार- मुरबाड
  32. राखी जाधव- घाटकोपर पूर्व
  33. देवदत्त निकम- आंबेगाव
  34. युगेंद्र पवार - बारामती 
  35. संदीप वर्पे- कोपरगाव
  36.  प्रताप ढाकणे- शेवगाव
  37. राणी लंके- पारनेर
  38. मेहबूब शेख- आष्टी 
  39. करमाळा-नारायण पाटील  
  40. महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर  
  41. प्रशांत यादव- चिपळूण
  42. समरजीत घाटगे - कागल
  43. रोहित आर आर पाटील- तासगाव  कवठेमहाकाळ 
  44. प्रशांत जगताप -हडपसर