Mumbai News: राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पर्यटन विभाग 'पर्यटन सुरक्षा दल' हा एक अभिनव उपक्रम राबवत आहे. याच उपक्रमाचा विस्तार करत आता मुंबईतील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवरही हे दल तैनात केले जाणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी 'गेट वे ऑफ इंडिया', 'गिरगाव चौपाटी' आणि नरिमन पॉइंट येथे तातडीने 'पर्यटन सुरक्षा दल' नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात मंत्री देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
(नक्की वाचा- ऑगस्ट महिन्यात 1 दिवसाचा OFF अन् 4 दिवसांच्या सुट्टीची मजा; Long Weekend कधी आहे, कुठे प्लान कराल?)
पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यटन वाढीला चालना
मंत्री देसाई म्हणाले की, सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'पर्यटन सुरक्षा दल' यशस्वीपणे कार्यरत आहे. याच यशाच्या धर्तीवर हा उपक्रम आता टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात वाढवला जात आहे. मुंबई हे देशातील आणि विदेशातील पर्यटकांचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. त्यामुळे जर त्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली, तर सुरक्षित पर्यटनाला चालना मिळून पर्यटन वाढीला वेग मिळेल.
देसाई यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉइंटसारख्या ठिकाणी 'पर्यटक सुरक्षा दल' तात्काळ नेमण्यात यावे.
नक्की वाचा - Night Shift: रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये वाढतेय प्रजनन क्षमतेसंबंधी समस्या, तज्ज्ञांचा गंभीर इशारा
राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तातडीने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचनाही मंत्री देसाई यांनी यावेळी दिल्या. या निर्णयामुळे मुंबईतील पर्यटनस्थळे अधिक सुरक्षित होतील आणि पर्यटकांना निर्भयपणे फिरता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.