Ambarnath News: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, शिंदे गट बॅकफूटवर; काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा मोठा निर्णय

Ambarnath Nagarparishad Election: अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सर्व 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिजवान शेख, ठाणे

अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या धक्कादायक निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून, भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या निकालानंतर सुरू असलेला राजकीय ड्रामा आता एका मोठ्या पक्षप्रवेशाने संपण्याची चिन्हे आहेत. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले सर्व 12 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत दिली आहे.

दोन दिवसात होणार 'महाप्रवेश'

रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी नव्हे, तर केवळ अंबरनाथच्या विकासासाठी भाजपसोबत येत आहेत. येत्या 2 ते 3 दिवसांत हा अधिकृत सोहळा पार पडेल. नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. "आम्ही अंबरनाथमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती आणि तोच अजेंडा पुढे नेण्यासाठी हे नगरसेवक आमच्यासोबत येत आहेत," असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

काँग्रेस ब्लॉक अध्यक्षांचा संताप

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील ज्यांचे पक्षाने निलंबन केले आहे, हे देखील उपस्थित होते. त्यांनी नगरसेवकांची बाजू मांडली. त्यावेळी बोलताने ते म्हणाले की, "आम्ही शहराच्या हितासाठी भाजपसोबत 'अंबरनाथ विकास आघाडी' केली होती. मात्र, आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची काही लोकांनी दिशाभूल केली. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट निलंबनाची कारवाई केली. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, त्यामुळेच आम्ही आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे."

Advertisement

अंबरनाथमधील नवे समीकरण

या 12 नगरसेवकांच्या प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे संख्याबळ आता 27 (15+12) वर पोहोचणार आहे. अजित पवार गटाच्या 4 सदस्यांच्या पाठिंब्यासह ही संख्या 31 होईल, ज्यामुळे भाजपची सत्ता अधिक भक्कम होईल आणि शिवसेना (शिंदे गट) पूर्णपणे बॅकफूटवर जाईल.