जाहिरात

Malshej Ghat: माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद! पर्यायी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण

Malshej Ghat: मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील करंजाळे येथे रस्ता खचल्याने घाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना खिरेश्वर–पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरलगतच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

Malshej Ghat: माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद! पर्यायी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी हैराण

अविनाश पवार, पुणे

पावसाळ्यात पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. माळशेज घाटातील करंजाळे परिसरामध्ये रस्ता खचल्यामुळे सुरक्षा आणि दुरुस्तीच्या कारणास्तव घाट मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. घाटातील रस्ता बंद झाल्यामुळे प्रशासनाने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. मात्र, या पर्यायी मार्गाची झालेली अत्यंत दुरावस्था आता वाहनचालकांसाठी आणि पर्यटकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

पर्यायी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा हिरमोड

माळशेज घाट बंद असल्याने पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना खिरेश्वर–पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरलगत असलेल्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे या रस्त्याची पार चाळण झाली आहे.

(नक्की वाचा-  पिंपरी-चिंचवडमध्ये 'आय फ्लू'चा उद्रेक! पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढले; डॉक्टरांचा गंभीर इशारा)

पर्यायी मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. धरणाच्या बॅकवॉटरलगतचा हा रस्ता आधीच अरुंद असून त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालवताना चालकांची मोठी कसरत होत आहे. तसेच गाड्यांचे मोठे नुकसान होत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

(नक्की वाचा-  Ajinkya Rahane: क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही रहाणेला BCCI कडून मिळणार दरमाह एवढी रक्कम)

पर्यटन विकासाच्या घोषणा कागदावरच?

पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दररोज माळशेज घाट परिसरात दाखल होत असतात. "राज्यात पर्यटनाला चालना देणार" अशा मोठ्या घोषणा प्रशासनाकडून आणि सरकारकडून वारंवार केल्या जातात. मात्र, प्रमुख पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याची झालेली ही दुरावस्था पाहता पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी या पर्यायी रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची आणि माळशेज घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com