जाहिरात

Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमधील रावेत येथील लंडन ब्रिजवर ऑनलाईन जुगारात पैसे गमावल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले.

Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...

सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला आणि सध्या आयटी हब हिंजवडी परिसरात राहणारा हा तरुण रावेत येथील लंडन ब्रिजवर आपल्या आईला व्हिडिओ कॉल करून नदीत उडी मारत असल्याचे थेट दाखवत होता. पण त्याच वेळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला मृत्यूच्या दारातून मागे खेचले.

15 हजार रुपये गमावल्याने उचलले पाऊल

रावेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या 20 वर्षीय तरुणाला ऑनलाईन जुगाराचे व्यसन जडले होते. या जुगारात त्याने 15 हजार रुपये गमावले होते. ही रक्कम गमावल्याच्या नैराश्यातून आणि घरातून होणाऱ्या त्रासाच्या भीतीने त्याने आपले जीवन संपवण्याचा थरारक निर्णय घेतला. तो रावेत येथील लंडन ब्रिजवर पोहोचला आणि थेट आपल्या आईला व्हिडिओ कॉल लावून, "आई मी नदीत उडी मारतोय..." असे म्हणत आत्महत्येचा लाईव्ह प्रयत्न करू लागला. त्यावेळी बुलढाणामध्ये असलेल्या त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांची मदतीसाठी धाव

हा सर्व थरार सुरू असतानाच, रावेत पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार आशिष बोटके आणि दशरथ सदगीर हे रात्रीच्या वेळेस त्या परिसरात नियमित गस्तीवर होते. गस्त घालत असताना त्यांना लंडन ब्रिजच्या पुलाच्या कठड्यावर एक तरुण अत्यंत संशयास्पद अवस्थेत उभा असलेला दिसला आणि तो मोबाईलवर कोणाशी तरी रडत बोलत होता.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणताही आवाज न करता तातडीने त्याच्या दिशेने धाव घेतली. अत्यंत हुशारीने आणि समयसूचकता दाखवून त्या तरुणाशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याचे लक्ष विचलित होताच, योग्य संधी साधून पोलिसांनी त्याला मागून घट्ट पकडले आणि पुलाच्या सुरक्षित बाजूला ओढले.

(नक्की वाचा-  E20 Petrol: नितीन गडकरींच्या बदनामीचा आरोप; 4 यूट्युबर्सवर नागपुरात गुन्हा दाखल)

समुपदेशन करून आईच्या स्वाधीन केले

पोलिसांनी वेळेत दाखवलेल्या या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. तरुणाला सुरक्षित स्थानी आणल्यानंतर रावेत पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्याची मनस्थिती स्थिर केल्यानंतर त्याचे योग्य प्रकारे समुपदेशन करण्यात आले. ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या आहारी न जाण्याबाबत त्याला समजावण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना संपर्क करून पोलिसांनी त्याला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे आणि कर्तव्याचे संपूर्ण पिंपरी-चिंचवडसह सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com