मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलनामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सायन-पनवेल हायवे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर वाहतूक सध्या तरी सुरळीत असल्याचे दिसत आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर गाड्यांची प्रचंड गर्दी आहे, ज्यामुळे मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी आणि प्रवासासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.
(नक्की वाचा- Sumona Chakravarti: 'आंदोलकांनी कार अडवली, घाणेरडे चाळे अन्..' अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव)
वाहनांच्या लांबच लांब रांगा
सायन-पनवेल हायवेवर वाशी टोल नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी ते मानखुर्द या संपूर्ण पट्ट्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
त्याचप्रमाणे, पश्चिम द्रुतगती महामार्गावरही बोरीवलीहून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांची गती मंदावली आहे. वाकोला, विलेपार्ले आणि अंधेरी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रचंड कोंडी दिसत आहे. याव्यतिरिक्त, सांताक्रूझ-वाकोला उड्डाणपुलावर रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यामुळे वाहतुकीचा वेग पूर्णपणे ठप्प झाला आहे.
(नक्की वाचा- Maratha Reservation: 'मनसे' मराठा बांधवांच्या मदतीला! 'शिवतीर्थ'वरुन कार्यकर्त्यांना थेट आदेश)
ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवरील स्थिती
एकीकडे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असताना, काही प्रमुख मार्गांवर मात्र वाहतूक सुरळीत आहे. पूर्व ईस्टर्न मार्ग म्हणजेच ईस्टर्न फ्रीवेवर सध्या वाहतूक सामान्य गतीने सुरू आहे. या मार्गावर खासगी वाहने आणि आंदोलकांच्या गाड्यांनाही प्रवेश दिला जात आहे. तसेच, अटल सेतूवरही वाहतूक सुरळीत दिसत आहे, ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, सकाळी 10 वाजल्यानंतर कार्यालयाच्या वेळा सुरू झाल्यावर या मार्गांवरही परिस्थिती बदलू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.