
Amit Thackeray Letter On Mumbai Maratha Morcha: मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधवही मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या सर्व आंदोलकांची राहण्याची, खाण्या- पिण्याची गैरसोय होत असल्याचं दिसत आहे. अशातच आता मुंबईमध्ये आलेल्या या मराठा बांधवांच्या मदतीला राज ठाकरेंची मनसे सरसावली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांंनी मनसैनिकांना याबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
अमित ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र!
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत, असं अमित ठाकरे म्हणालेत.
CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद! दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी 'हे' वाचा
आंदोलकांच्या सुरक्षेची काळजी घ्या...
"ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे. माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे," असे आदेश अमित ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, "लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे," असंही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world