भुजबळांचं ओपन चॅलेंज जरांगेंनी स्वीकारलं; विधानसभा निवडणुकीची सर्वात मोठी अपडेट 

आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील 288 जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

‘मनोज जरांगेंनी विधानसभेच्या 288 पैकी 88 जागा लढवाव्यात आणि किमान आठ जागा तरी निवडून आणून दाखवाव्यात. हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे,' असं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सांगलीत ओबीसी महाएल्गार मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं. पाटलांनीही भुजबळांचं आव्हान स्वीकारलं असून NDTV मराठीसोबत बोलताना तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील 288 जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राखीव जागाही लढणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे विधानसभेत सर्व समाजाचे उमेदवार असतील असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत भुजबळ विरूद्ध जरांगेंमध्ये जुंपणार असल्याचं दिसून येत आहे.   

Advertisement

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप...
‘मराठ्यांना आरक्षण द्या; पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका,' असं भुजबळांकडून वारंवार सांगितलं जात आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यावरही भुजबळांनी टीका केली आहे. सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्यांचे वारसदार कुठे? आम्ही तुमची खासदारकी न्यायला आलो नाही, असं भुजबळ म्हणाले. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. मी केंद्रातील चार विधितज्ज्ञांशी बोललो आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. सगेसोयरे यांना तर देता येणारच नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे,' असे भुजबळ म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही. आमचा विरोध सगे-सोयरेला आहे. ओबीसीमध्ये घुसखोरी सुरू आहे. त्याविरोधात हा लढा आहे.' माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी या वेळी जरांगे यांच्यावर टीका केली. या वेळी प्रा. लक्ष्मण हाके, माजी मंत्री अण्णा डांगे, नवनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.

Advertisement

नक्की वाचा - मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा सोडवता येईल? शरद पवारांनी सांगितला पर्याय

ठाकरे, पवारांची भूमिका काय? भुजबळांचा सवाल
‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, हे एकदा जाऊन विचारा. प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी बचाव यात्रा काढली आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध केला आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले दिले, तर महाराष्ट्रात मराठा समाजच राहणार नाही. ओबीसी समाज हा 54 टक्के आहे. आम्हाला 27 टक्के आरक्षण आहे. तेही पूर्ण भरले जात नाही. 27 टक्के आरक्षणासमोर साडेनऊ टक्के आरक्षण भरले आहे. मग आमचा बॅकलॉग किती आहे? आमचा बॅकलॉग भरा, मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा,' असे भुजबळ म्हणाले. महाराष्ट्रात एक नवा नेता तयार झाला. तो रोज नवीन मागणी करतो. कधी म्हणतो सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या. कधी म्हणतो सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. चार-चार आयोगांनी ते शक्य नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचे म्हटले आहे.

Advertisement