जाहिरात

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलकांना या अटींचा पालन करावं लागणार; उल्लंघन केल्यास कारवाई होणार

Manoj Jarange Patil: आंदोलनादरम्यान कोणताही गोंधळ किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये. ध्वनीक्षेपक किंवा गोंगाट करणारी उपकरणे वापरण्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची सशर्त परवानगी मुंबई पोलिसांनी दिली आहे. या पत्रानुसार, 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन किंवा उपोषण करण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी 'जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम 2025' नुसार काही महत्त्वपूर्ण अटींवर दिली आहे.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पोलिसांनी फक्त एका दिवसासाठी परवानगी आहे. हे आंदोलन सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच करता येईल. त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही. आंदोलनात जास्तीत जास्त 5000 लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी आहे. आझाद मैदानातील राखीव जागेची क्षमता 7000 स्क्वेअर मीटर असून, ती 5000 आंदोलकांनाच सामावून घेऊ शकते.

(नक्की वाचा-  मनोज जरांगेंनी रणनीती बदलली; मराठा मोर्चा 7 टप्प्यांत होणार, सूत्रांची माहिती | NDTV Marathi Exclusive)

वाहनांबाबतचे नियम

आंदोलकांच्या ठराविक वाहनांनाच परवानगी दिली आहे. आंदोलकांची वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर इस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील. त्यानंतर, फक्त 5 वाहनांना मुख्य आंदोलकासोबत आझाद मैदानावर जाण्याची परवानगी आहे, तर इतर वाहने पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणी पार्क करावी लागतील.

आंदोलनादरम्यान कोणताही गोंधळ किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये. ध्वनीक्षेपक किंवा गोंगाट करणारी उपकरणे वापरण्याआधी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, आंदोलक मैदानात अन्न शिजवणार नाहीत किंवा कचरा टाकणार नाहीत, असेही नमूद केले आहे. आंदोलनामध्ये लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये, अशीही खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

(नक्की वाचा-  Manoj Jarange Maratha Morcha: "जाणूनबुजून फक्त एका दिवसाची परवानगी दिली", जरांगेंचा CM फडणवीसांवर निशाणा)

मुंबई उच्च न्यायालयाच्या 26 ऑगस्ट 2025 च्या अंतरिम आदेशाचा संदर्भ देते या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, आंदोलकांनी संबंधित प्राधिकरणाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच, लोकशाही आंदोलनांमुळे सामान्य जीवन आणि वाहतूक बाधित होणार नाहीत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचाही पत्रात पुनरुच्चार करण्यात आला आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई

मराठा आंदोलकांनी या अटी व शर्तींचे उल्लंघन केले किंवा कायद्याचा भंग केल्यास, सदर आंदोलन बेकायदेशीर घोषित करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com