
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता एका नवीन आणि आक्रमक टप्प्यात पोहोचले आहे. मुंबईत होणारं मनोज जरांगे यांचं आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NDTV मराठीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन 7 टप्प्यांत विभागले आहे.
गाव ते राज्यपातळीपर्यंत आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, हे आंदोलन फक्त मुंबईतच होणार नाही, तर गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत त्याचे आयोजन केले जाईल. याचाच अर्थ, जिथे मराठा समाज राहतो, तिथे हे आंदोलन सुरू होईल. उद्या (29 ऑगस्ट) पासून फक्त मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर आंदोलन होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Manoj Jarange Maratha Morcha: "जाणूनबुजून फक्त एका दिवसाची परवानगी दिली", जरांगेंचा CM फडणवीसांवर निशाणा)
आंदोलनाची नवी रणनीती
मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले होते, पण आता सरकारने दिलेल्या वागणुकीमुळे त्यांनी आपली रणनीती बदलली असल्याचे दिसत आहे. एकाच वेळी राज्यभर आंदोलन सुरू करून सरकारवर दबाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या 7 टप्प्यांच्या आंदोलनात कोणते टप्पे असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यात विविध प्रकारच्या आंदोलनांचा समावेश असू शकतो, जसे की, रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, आणि तहसील कार्यालयांसमोर निदर्शने. यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र आणि निर्णायक वळणावर पोहोचला आहे.
(नक्की वाचा- Maratha Reservation: 'इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही', भाजप नेत्यांचं जरांगेंना प्रत्युत्तर)
या मोठ्या घडामोडीमुळे राज्य सरकारवर अधिक दबाव येईल अशी शक्यता आहे. मराठा समाजाला शांत करण्यासाठी सरकार आता काय पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरले, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world