मनोज सातवी/रिजवान शेख, NDTV मराठी
नाशिकमधील तपोवणातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच, आता मुंबईजवळील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. पालघरमध्ये 'जंगल वाढवण्याच्या' नावाखाली 'जंगल नष्ट' करण्याचा या प्रकारावर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाण्यातील मनोरुग्णालय येथे वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे.
पालघरमध्ये झाडांची कत्तल
पालघर तालुक्यातील दहिसर वनपरीक्षेत्रातील दुर्वेस गावाच्या हद्दीत हा गंभीर प्रकार समोर आला आहे. वनविभागाच्या जागेवर शासनाची दिशाभूल करून 'मियावाकी जंगल' उभारण्याच्या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या राखीव वन कंपार्टमेंट क्रमांक 167 मध्ये दोन हेक्टर क्षेत्रावर 44 हजार झाडांची लागवड करण्याचे नियोजन आहे.
(नक्की वाचा- Girls Missing: नवी मुंबईनंतर विदर्भातील 'या' जिल्ह्यातून 3 मुली रहस्यमयरित्या गायब; पालकांची चिंता वाढली)
परंतु, त्यासाठी आधीच घनदाट असलेल्या आणि चार ते पाच फूट उंचीच्या झाडांची मोठ्या संख्येने कत्तल करण्यात आली आहे. लाखो झाडांच्या या कत्तलीसाठी जबाबदार असलेल्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे (FIR) दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ठाणे मनोरुग्णालय परिसरातही झाडांवर कुऱ्हाड
ठाणे शहरातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील मनोरुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी येथील 1 हजार 614 झाडांपैकी 724 झाडांची कत्तल होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्याकडून आवश्यक परवानगी घेऊन ही वृक्षतोड सुरू केली आहे.
(नक्की वाचा- VIDEO: 'त्या' बॉडीगार्डला पुतीन आयुष्यभर आठवतील; व्हिडीओची जगभरात होतेय चर्चा)
एका बाजूला मियावाकी जंगल उभारण्यासाठी जुनी झाडे तोडली जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला विकास प्रकल्पांसाठी हिरवळ नष्ट केली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात पर्यावरण संतुलन राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world