- मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Matheran News: निसर्गरम्य माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. माथेरानच्या घाटात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घाट परिसरातून चालत प्रवास करणे आता धोक्याचे ठरत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
माथेरानमध्ये रात्रीच्या वेळेस फिरणे टाळा
मिळालेल्या माहितीनुसार, काही पर्यटक रात्रीच्या वेळी कारने माथेरानचा घाट उतरत होते. दस्तुरी नाका परिसरातील पिसारनाथ मंदिराजवळ अचानक एका मोठ्या बिबट्याने रस्त्यावर दर्शन दिले. कारच्या हेडलाइटच्या प्रकाशात बिबट्या स्पष्टपणे दिसत होता. काही सेकंद हा बिबट्या कारच्या पुढच्या बाजूला रस्त्यावरून पळत होता. यामुळे कारमधील पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. पण काही वेळाने बिबट्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावरून थेट जंगलात उडी मारली आणि तो पसार झाला.
पाहा व्हिडीओ
(नक्की वाचा: Maharashtra Heat Wave SOP: सावधान! महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; राज्य सरकारकडून 3 SOP जाहीर, काय आहेत नियम?)
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
माथेरानचा घाट रस्ता हा घनदाट झाडीतून जातो. अनेक पर्यटक रात्रीच्या वेळी ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी किंवा फिरण्यासाठी घाटातून चालत ये-जा करतात. पण बिबट्याचा वावर याच रस्त्यावर दिसून आल्याने आता रात्रीचे फिरणे जीवघेणे ठरू शकते. स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. माथेरानमधील पिसारनाथ मंदिर आणि दस्तुरी नाका हा भाग पर्यटकांच्या वर्दळीचा असतो, पण रात्रीच्या शांततेत वन्यप्राणी शिकारीच्या शोधात रस्त्यावर येत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world