- म्हाडाने गोरेगावमधील मोतीलाल नगरचा पहिला टाऊनशिप प्रकल्प तयार करून त्याचा मास्टर प्लॅन निश्चित केला आहे
- 143 एकर क्षेत्रात पुनर्विकास होऊन लहान घरांऐवजी १६०० चौरस फूटांच्या प्रशस्त घरांची निर्मिती होणार आहे
- म्हाडाने केवळ परवडणारी घरे नव्हे, तर खासगी विकासकांसह आधुनिक आणि सुसज्ज घरे देण्याचा निर्णय घेतला आहे
झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी आणि जुन्या इमारतींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सध्या मुंबईक अनेक पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आता एका ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. म्हाडाने आपल्या पहिल्या 'टाऊनशिप' गृहनिर्माण प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. या अंतर्गत गोरेगावमधील मोतीलाल नगरचा कायापालट होणार आहे. याबाबत आधी केवळ चर्चा होती. मात्र आता म्हाडाने याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे या कायापालटावर आता अंतिम मोहर लागली आहे.
गोरेगावच्या मोतीलाल नगरमधील 143 एकर जागेवर ही आधुनिक टाऊनशिप उभारली जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सध्या येथे अवघ्या 230 चौरस फुटांच्या छोट्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पुनर्विकासानंतर चक्क 1,600 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार आहे. म्हाडाने आता केवळ परवडणारी घरे देण्यापुरते मर्यादित न राहता, खासगी विकासकांच्या तोडीस तोड आधुनिक आणि सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही वर्षांत म्हाडाने आपल्या धोरणांमध्ये मूलभूत बदल केले आहेत. केवळ लहान सोसायट्यांचा पुनर्विकास न करता, आता मोठ्या लेआउट्सच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. मोतीलाल नगरसह एसव्हीपी नगर, जीटीबी नगर, अभ्युदय नगर, कामाठीपुरा, आदर्श नगर आणि आराम नगर यांसारख्या प्रमुख वसाहतींच्या पुनर्विकासाचे कामही सुरू आहे. या टाऊनशिपमध्ये नागरिकांना केवळ घरेच नव्हे, तर सुधारित क्रीडांगणे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्रे आणि आधुनिक व्यावसायिक केंद्रे यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.
हा प्रकल्प 'सी अँड डीए' (C&DA) मॉडेल अंतर्गत राबवला जाणार आहे. जरी या कामासाठी इतर सक्षम संस्थांची मदत घेतली जाणार असली, तरी या संपूर्ण प्रकल्पाची मालकी आणि नियंत्रण म्हाडाकडेच राहणार आहे. घरांची गुणवत्ता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी म्हाडाने स्वतःकडे घेतली आहे. यामुळे भविष्यात म्हाडा आता खासगी बिल्डरांच्या बरोबरीने मुंबईत आलिशान घरांची विक्री करताना दिसेल. सध्या या गोरेगावच्या पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. म्हाडाच्या निर्णयामुळे इथंल्या रहिवाशांची मात्र चांदी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world