जाहिरात

Mumbai News : धोकादायक इमारत, 700 हून अधिक रहिवाशांचा जीव टांगणीला; मुंबईकरांचा दररोज जीवाशी खेळ

अद्याप मुंबईतील ही धोकादायक इमारत रिकामी केली नाही आणि पुनर्वसनही रखडल्याने व्यापारी, रहिवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा आहे.

Mumbai News : धोकादायक इमारत, 700 हून अधिक रहिवाशांचा जीव टांगणीला; मुंबईकरांचा दररोज जीवाशी खेळ

Mumbai News : दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील 130 वर्षे जुन्या स्वदेशी मार्केट इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने रहिवासी आणि भाडेकरूंमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही इमारत धोकादायक असूनही रिकामी करण्यात आलेली नाही. पावसाच्या तोंडावर अद्याप कारवाई न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अद्याप इमारत रिकामी केली नाही आणि पुनर्वसनही रखडल्याने व्यापारी, रहिवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची चर्चा आहे.

गेली अनेक वर्षे स्वदेशी मार्केटमध्ये कपड्यांचा व्यापार सुरू आहे. व्यापारी संघटनेतील काही सदस्यांकडून पुनर्विकास प्रक्रियेत अडथळे आणले जात असल्याचा आरोप होत असून म्हाडाकडून ही इमारत धोकादायक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी लवकरात लवकर ही दुकानं आणि घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. पण या मार्केटच्या व्यवस्थापनाने पुनर्विकासाऐवजी ही इमारतीच्या डागडुजीचं काम काढलं आहे. पण हा. पुर्नविकास का रखडवला जात आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

रहिवाशी आणि व्यापाऱ्यांच्या जीवाशी खेळ

या चार इमारतींमध्ये सुमारे 720 भाडेकरू आणि 55 रहिवाशी वास्तव्यास आहेत. पुनर्विकासाला पाठिंबा देणाऱ्या रहिवाशांच्या मते, स्वतःचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी काही व्यापारी रहिवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. इथले रहिवासी सांगतात , गेली अनेक वर्षे आम्ही कुटुंबासह या इमारतीत राहतो. पावसाळ्यात ही इमारत कोसळेल का अशी भीती वाटत राहते. मोठा पाऊस आला तर ही इमारत कंप पावते. अनेक दुकानांचे सज्जे पडले आहेत. इथं राहणं आणि व्यापार करणं हा जीवाशी खेळ आहे. पण व्यवस्थापनाकडून वैयक्तिक स्वार्थापोटी जीवाशी खेळ केला जात आहे.

नोटीस येऊन एक वर्ष उलटून गेले तरीही कारवाई नाही...

स्वदेशी मार्केट इमारतीची 1960 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये स्वदेशी मार्केटचा पूल कोसळला. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक होत गेल्याने 2016 मध्ये केवळ दुरुस्ती न करता पुनर्विकासाची मागणी जोर धरू लागली. 2023 मध्ये या प्रकरणातील कारवाईला वेग आला. फेब्रुवारी महिन्यात बीएमसीकडून दोन नोटीसा बजावण्यात आल्या, तर जुलै 2023 मध्ये इमारत बी-1 श्रेणीतील धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये पीपीपी निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. 26 जून 2025 ला म्हाडाकडून ही इमारत सी-1 श्रेणीतील धोकादायक इमारत म्हणून घोषित करून 7 दिवसांच्या आत रिकामी करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. नोटीस येऊन एक वर्ष उलटून गेले तरीही ही इमारत रिकामी करण्यात आलेली नाही.

या आधीच्या व्यवस्थापनातील 10 सदस्यांनी पुनर्विकासाचं काम मार्गी लावल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, नोव्हेंबर 2025 मध्ये मार्केट व्यवस्थापनाच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये नवीन सदस्य निवडून आले. या निवडीच्या वेळी स्वदेशी युनायटेडच्या घोषणापत्रात संघटनेच्या सुरक्षेसाठी 7 नवीन संचालकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच तत्काळ आणि पारदर्शक पुनर्विकास प्रक्रिया राबवण्याचा दावा करण्यात आला. पण प्रत्यक्षात कोणतीही आश्वासनं पूर्ण न करता हा पुनर्विकास व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com