MGNREGA News : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात एक उच्चस्तरीय संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात ही उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव श्री. मराळे, दिव्यांग कल्याण विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(नक्की वाचा- एका भविष्यवाणीने खळबळ! धडाधड विमान आणि हॉटेल बुकिंग रद्द, 5जुलैला काय होणार?)
बैठकीत बच्चू कडू यांनी अनेक प्रमुख मागण्या मांडल्या. ज्यात पेरणीपासून कापणीपर्यंतच्या सर्व शेतीशी संबंधित मजुरीच्या कामांचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार निर्मिती योजना अर्थात मनरेगा अंतर्गत करावा. त्यांनी फळांची लागवड आणि दुग्धव्यवसाय यांना रोजगार हमी योजनेशी जोडणे, मनरेगा अंतर्गत दैनिक वेतन दर 312 रुपयांवरून 500 करणे आणि अपंग व्यक्ती आणि विधवा महिलांना मासिक मानधन 6000 देणे या मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
(नक्की वाचा- बचत खातेधारकांना फटका! SBI, HDFC, ICICI बँकांचा मोठा निर्णय)
या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री गोगावले म्हणाले, या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून, योग्य तो अभिप्राय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्य शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली.