
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC, ICICI इत्यादी बँकेत बचत खाते (Saving Account) असणाऱ्यांना काहीसा फटका बसणार आहे. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (RBI Repo Rate Cut) ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली. त्यानंतर अनेक बँकांनी जून २०२५ मध्ये बचत खात्यांवरील व्याजदरातही कपात केली आहे. याचा थेट परिणाम आता ठेवींवर आणि त्यावरील परताव्यावर होणार आहे.
एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने आता बचत खात्यांवरील व्याजदर समान पातळीवर कमी केले आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात १०,००० रुपये असोत किंवा १० कोटी रुपये तुम्हाला समान व्याजदर मिळेल.
(नक्की वाचा : अबब! 6861% टक्के रिटर्न्स!! या धमाकेदार शेअरमध्ये अजून गुंतवणुकीची संधी आहे ?)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
एसबीआयने १५ जून २०२५ पासून नवीन व्याजदर लागू केला आहे. पूर्वी, १० कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर २.७ टक्के आणि १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर ३ टक्के व्याज मिळत होते. आता सर्व शिल्लक रकमेवर एकसमान २.५ टक्के वार्षिक व्याज उपलब्ध असेल.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
आयसीआयसीआय बँकेने 12 जूनपासून बचत खात्यांचे व्याजदर बदलले आहेत. पूर्वी, जर तुमच्या खात्यात ५० लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला २.७५ टक्के व्याज मिळत असे. त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर ३.२५ टक्के व्याज मिळत असे. आता, कितीही रक्कम शिल्लक असली तरी, प्रत्येकाला २.७५ टक्के वार्षिक व्याज मिळेल.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँकेनेही १० जूनपासून व्याजदर कमी केले आहेत. यापूर्वी ५० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर २.७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त रकमेवर ३.२५ टक्के व्याज मिळत होते. आता सर्व बॅलन्सवर हाच व्याजदार २.७५ टक्के असणार आहे.
(नक्की वाचा : रेपो रेट कपातीनंतर कर्जदारांना खूशखबर! या पाच बँकांची कर्जे झाली स्वस्त)
इंडसइंड बँक
इंडसइंड बँक आता त्यांच्या ग्राहकांना बचत खात्यांवर ३ टक्के ते ५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. जे तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेनुसार ठरवले जाते. हे नवीन दर १६ जून २०२५ पासून लागू झाले आहेत.
याचा अर्थ असा की जर तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत खात्यात जमा केला असेल तर आता परतावा पूर्वीपेक्षा कमी असेल. त्यामुळे येणाऱ्या काळात बचतीवर चांगला परतावा मिळण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world