मनोज सातवी, पालघर
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करत 16 वर्षीय मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी पोलिसांनी तिचे आई-वडील, सासू-सासरे, लग्न लावणारा भटजी, आचारी, मंडप डेकोरेटर अशा आणखी 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला आहे.
मोखाडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या कातकरी समाजातील तरुणीचे जव्हार तालुक्यातील नेहाळे येथील 21 वर्षीय तरुणाचे दोन वर्षांपासून मुलीशी प्रेमसंबंध होते. यादरम्यान ती गरोदर राहिली होती. तिच्या कुटुंबीयांनी गेल्या 29 मार्च रोजी तिचे लग्न जयेशसोबत लावले होते.
(नक्की वाचा- हुंड्यासाठी छळ! 9 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, मग आईने उचललं टोकाचे पाऊल)
लग्नाअगोदर गरोदर असलेल्या या अल्पवयीन मुलीचा 6 जून रोजी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. यावेळी ती साधारण पाच ते सहा महिन्याची गरोदर होती. सुरुवातीला तिच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु पोलिसांच्या तपासानंतर, 22 जून रोजी अल्पवयीन मुलीच्या विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या पती आणि इतर 10 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
यामध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांचे पालक, मुलीचा मेहुणा, डेकोरेटर, केटरर, पुजारी आणि लग्नाच्या सोहळ्याशी संबंधित असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) एन (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे) आणि 34 (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 च्या कलम 9, 10 आणि 11 नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा:बाबा आमटेंचं आनंदवन हादरलं, बाथरूममध्ये 25 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?)
पोलिसांनी आतापर्यंत मृत अल्पवयीन विवाहितेच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रदीप गीते यांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील काही आदिवासी समुदायांमध्ये अल्पवयीन मुलांचे विवाह हे सामान्य आहेत. खरंतर, बहुतेक किशोरवयीन तरुण-तरुणी वयात आल्यावर एकत्र राहू लागतात. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली होती. मात्र अद्यापही या परिसरातील परिस्थिती सुधारलेली नाही.
(नक्की वाचा: संतापजनक! नमाज पठणादरम्यान ओळ चुकल्याने पतीने पत्नीसोबत केले भयंकर कृत्य)
अल्पवयीन जोडप्यांचा शारीरिक विकास होत नसल्यामुळे, त्यांची मुलं अनेकदा कमी वजनाची असतात आणि त्यामुळे कुपोषण होते. ही या परिसरातील आदिवासी समाजातील मुलांच्या आरोग्याची एक मोठी समस्या आहे. त्यामुळे शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.