Mira Road News: निवडणुकांचे वारे वाहत असतानाच मीरा रोड पूर्व येथील इंद्रप्रस्थ सोसायटीमधील 800 रहिवाशांनी राजकीय नेत्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे. सोसायटीच्या अगदी समोर असलेल्या बापा सीताराम मंदिरात होणाऱ्या लग्नकार्यांमुळे होणाऱ्या प्रचंड आवाजाचा आणि ट्रॅफिकचा रहिवाशांना मोठा त्रास होत आहे.
स्थानिक पोलिस आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. या समस्येवर स्थानिक नेत्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आपल्या सोसायटीत नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे.
रहिवाशांची मुख्य तक्रार
रहिवाशांनी म्हटलं की, आम्ही आमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक बॅनर लावला आहे ज्यामध्ये राजकीय पक्षांना येथे प्रचार करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, कारण ते आम्हाला मदत करत नाहीत. दररोज रात्री आमची झोप विस्कळीत होते. परीक्षेच्या वेळी विद्यार्थीही अभ्यास करू शकत नाहीत."
(नक्की वाचा- Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?)
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दिवाळी किंवा नवरात्रीला रात्री 10 नंतर डीजेवर बंदी असते. मात्र, या मंदिरातील लग्नकार्यांत रात्री 12.30 ते 1 वाजेपर्यंत बँड बाजा आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असते. लग्नाच्या वरातीमुळे सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार तास-दोन तास बंद राहते. वृद्धांना आणि रुग्णांना रिक्षातून उतरून पायी चालावे लागते.
शिक्षणावर परिणाम
सोसायटीकडे जाणारा रस्ता सायलेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. कोणीतरी वर्षांपूर्वी लावलेले सायलेंट झोन बोर्ड काढून टाकले आहेत. इमारत परिसरातील या गोंगाटामुळे मुलांना अभ्यास करणे अशक्य होते, अशी व्यथा पालकांनी मांडली. रहिवाशांनी आरोप केला की, पोलीस आल्यावर 5 मिनिटे डीजे बंद होतो, पण पोलीस निघून गेल्यावर पुन्हा दणदणाट सुरू होतो.
(नक्की वाचा- Pune News: बैठका, चर्चा, वाटाघाटी सगळं व्यर्थ; पुण्यात शिवसेना-भाजप युती अखेर तुटली; काय आहेत कारणे?)
मंदिर ट्रस्ट आणि भाजप उमेदवाराची भूमिका
बापा सीताराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि मीरा रोडमधील भाजप नेते अनिल विराणी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "आम्ही आतापर्यंत 400 हून अधिक विवाह विनामूल्य लावून दिले आहेत. हे गरिबांना मदत करण्यासाठी केलेले समाजकार्य आहे, यातून आम्हाला कोणतेही उत्पन्न मिळत नाही. रहिवाशांना त्रास होत असल्याचे आम्हाला समजले आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू."