जाहिरात

Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?

भाजपकडून तब्बल 13 इच्छुक उमेदवारांना एबी (AB) फॉर्मचे वाटप करण्यात आले. मात्र या फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची अधिकृत सही नसल्याचे समोर आल्याने संबंधित उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

Navi Mumbai: AB फॉर्म मिळाले, सगळी तयारीही केली, मात्र अखेरच्या क्षणी ट्विस्ट; भाजपच्या 13 उमेदवारांची फसवणूक?

राहुल कांबळे, नवी मुंबई

नवी मुंबई शहर भाजपमध्ये सध्या तीव्र अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षातीलच काही कार्यकर्ते थेट भाजपाच्या विरोधात काम करत असल्याचे चित्र समोर येत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच तीव्र झाल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपकडून तब्बल 13 इच्छुक उमेदवारांना एबी (AB) फॉर्मचे वाटप करण्यात आले. मात्र या फॉर्मवर जिल्हाध्यक्षांची अधिकृत सही नसल्याचे समोर आल्याने संबंधित उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अधिकृत सहीशिवाय फॉर्म देण्यात आल्यामुळे आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. “सही न करता एबी फॉर्म देऊन आम्हाला उल्लू बनवण्यात आले,” असा संतप्त आरोप काही उमेदवारांनी केला आहे.

(नक्की वाचा- What is AB Form: एबी फॉर्म म्हणजे काय? निवडणुकीत त्याचे महत्त्व काय? Q&A)

नंतर सही करण्याचं आश्वासन

जिल्हाध्यक्षांकडून ‘नंतर सही करण्यात येईल' असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाही जिल्हाध्यक्ष संपर्काबाहेर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या 13 ही उमेदवारांची उमेदवारी थेट अडचणीत सापडली असून, निवडणूक प्रक्रियेबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

मंदा म्हात्रे समर्थक उमेदवारांची जाणीवपूर्वक फसवणूक?

या संपूर्ण प्रकरणात आमदार मंदा म्हात्रे समर्थक उमेदवारांची जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेले सर्व 13 उमेदवार थेट आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तेथे जोरदार चर्चा आणि नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(नक्की वाचा-  Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग)

या घडामोडींमुळे नवी मुंबईतील भाजपाची अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, पक्षातील गटबाजी आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारीचा पेच सुटतो की भाजपला अंतर्गत वादाचा मोठा फटका बसतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com