जाहिरात

Pune News : 5 तासांचा 'ट्रॅफिक जाम' : बिबट्याच्या दहशतीमुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प, प्रशासनाला थेट आव्हान

Pune Shirur News : शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Pune News :  5 तासांचा 'ट्रॅफिक जाम' : बिबट्याच्या दहशतीमुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प, प्रशासनाला थेट आव्हान
Pune Nashik Highway Jam : पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली आहे.
शिरुर, पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Shirur News : शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जांभूत आणि पिंपरखेड ही गावे बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली असून, केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक महामार्ग 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला.

काय आहे कारण?

उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली असून, पिंपरखेड गावातील नागरिकांचा संयम आता संपला आहे. अलीकडेच, पिंपरखेडमध्ये एका महिन्यात 3 नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड संताप आहे.

या पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला. त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवार किंवा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकावे अशी मागणी केली आहे.

Latest and Breaking News on NDTV

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना फोन लावला आणि नागरिकांचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मात्र, केवळ फोनवरील आश्वासनांनी ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. पालकमंत्री किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी, या मागणीवर नागरिक ठाम आहेत. परिसरातील आमदारांनीही येथे उपस्थित राहावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांची होणार ट्रॅफिकमधून सुटका! पुणे मेट्रो 3 चा बाणेरपर्यंत विस्तार, वाचा सर्व माहिती )
 

5 महिन्यांत 11 बळी

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची मालिका थांबत नाहीये. जांभूत गावात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करून 13 वर्षीय रोहन बोंबे या कोवळ्या मुलाचा बळी घेतला आहे. रोहनच्या मृत्यूमुळे गेल्या 5 वर्षांत शिरूर वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. या 11 बळींमध्ये 5 जण एकट्या जांभूत आणि पिंपरखेड या गावातील आहेत.

पिंपरखेड गावात रोहन बोंबेवर बिबट्याने हल्ला केला आणि हल्ला एवढा भीषण होता की रोहनचा जागीच अंत झाला. रोहनचे वडील आणि मामा त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी शेतात धावले, तेव्हा बिबट्या त्यांच्या अंगावर धावून गेला. अखेर, रोहनच्या मामाने भाच्याचा मृतदेह अंगावर टाकून घराकडे आणला. आपल्या मुलाला डोळ्यासमोर गमावल्याने रोहनचे वडील आक्रंदन करत असून, ते प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत.

या हल्ल्याच्या आठवड्याभरापूर्वीच पिंपरखेड येथे एका 6 वर्षीय मुलीचा (शिवांगी) मृत्यू झाला होता. या दुहेरी धक्क्यातून गावकरी सावरले नाहीत तोच हा तिसरा बळी गेल्याने संताप वाढला आहे.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
 

 'बिबट्याला मारण्याची परवानगी द्या!'

वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी आता वनविभागाला थेट आव्हान दिले आहे. 'आम्हाला बिबट्याला मारण्याची परवानगी द्या!' अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या हालचाली या भागात सुरू आहेत, पण वनविभागाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटते आणि मुले शाळेत जाताना मनात धडधड असते. वनविभाग फक्त पिंजरे लावते, पण बिबट्याला पकडत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. 'भय इथले संपत नाही' अशी आजची परिस्थिती आहे.

Latest and Breaking News on NDTV

 यावर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पिंजरे बसवले असून, तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. मात्र, नागरिकांचा संताप मात्र ओसरलेला नाही. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी देखील या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे.

वन्यजीव तज्ज्ञांचा इशारा आणि उपाययोजना

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, या भागात जंगल आणि मानवी वस्ती एकमेकांच्या जवळ आल्याने बिबट्यांची उपस्थिती वाढली आहे.

तात्काळ उपाययोजना:

  • रात्री फिरणे टाळणे.
  • पशुधन सुरक्षित ठेवणे.
  • गावाभोवती लाईटची सोय वाढवणे.

तज्ज्ञांनी हे उपाय सुचवले असले तरी, हे उपाय मृत्यूचे सत्र थांबवू शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या हल्ल्याने शिरूर तालुका हादरला असून, प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर आणखी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांचा संयम आता संपला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com