व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून मुजोरी करणाऱ्या एका दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला धडा शिकवला. "देख लिया राजस्थानी का पॉवर. मराठी को महाराष्ट्र मे ही पेल दिया. हम मारवाडी, हमारे सामने किसी की नही चलती" असे स्टेटस ठेवणाऱ्या या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बुधवारी घडलेल्या या प्रकारानंतर गुरुवारी एनडीटीव्ही मराठीची टीम या परिसरात पोहोचली तेव्हा हे दुकान बंद आढळले. चौकशी केली असता, या मुजोर दुकानदाराला केवळ मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून हाकलून दिल्याचे समोर आले आहे.
( नक्की वाचा: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे )
मराठीच्या मुद्द्यावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या एकत्र मेळाव्यापूर्वी मीरा रोड इथे एका मारवाडी दुकानदाराने मनसेच्या कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन केले होते. या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी चोपले होते. या घटनेनंतर मीरा रोडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने मोर्चाही काढला होता. जे मराठीचा आदर करणार नाहीत, त्यांना फटके पडणारच असे मनसेच्या नेत्यांनी म्हटले होते. या घटनेचा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातही केला होता. यापुढे धडा शिकवताना त्याचे व्हिडीओ काढू नका, असा सल्ला राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानुसार विक्रोळीमध्ये मुजोर दुकानदाराला धडा शिकवल्यानंतर त्याचा व्हिडीओ काढण्यात आला होता.
( नक्की वाचा: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच' मनसेचा इशारा )
विक्रोळी स्टेशन परिसरात सोनावणे चाळीमध्ये लकी आयुर्वेदिक भांडार नावाचे हे दुकान आहे. 'विक्रोळीतील सर्वात जुने आणि विश्वसनीय आयुर्वेदिक औषधाचे दुकान' असे या दुकानाच्या बोर्डवर लिहिण्यात आले आहे. हे दुकान प्रेमसिंह देवारा याला चालवण्यासाठी दिले होते असे सांगण्यात येत आहे. त्याने व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये 'मराठी को महाराष्ट्र मे ही पेल दिया' असे वाक्य ठेवल्याचे मनसे कार्यकर्त्यांना समजले होते. त्यानंतर त्यांनी हे दुकान गाठत या प्रेमसिंहला धडा शिकवला. या सगळ्या प्रकारानंतर दुकान मालकाने प्रेमसिंहला गावी पाठवून दिले असून तो ज्या खोलीत भाड्याने राहात होता, ती देखील त्याला तात्काळ खाली करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे या प्रेमसिंहने रातोरात मुंबईतून धूम ठोकली.