वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा राज्य सरकारनं केलीय. सरकारचा हा निर्णय सध्या वादात सापडलाय. हा निधी देण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्य सरकारवर टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील या वादात उडी मारलीय. वक्फ बोर्डाला निधी पुरवून बळकटी देणे म्हणजे हिंदूंची वळकटी बांधण्यासारखं आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करु नये, असा खोचक टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लगावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले प्रकाश महाजन?
वक्फ बोर्डाने एखाद्या जमिनीवर हक्क सांगितला तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. वक्फ बोर्डाकडून जावे लागते. या सगळ्या जमिनी आदिवासी, वंचित ,वनवासी समाजाच्या असतात. देशाचे कायदे जर या बोर्डाला लागू नाहीत तर हे बोर्ड बरखास्त करावं अशी आम्ही मागणी करतो. वक्फ बोर्डाला निधी पुरवून बळकटी देणे म्हणजे हिंदूंची वळकटी बंधण्यासारखं आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी मात्र दाढीवाल्यांना मदत करू नये, अशी टीका महाजन यांनी केली.
भुजबळांना उत्तर
राज ठाकरे यांचं बाळासाहेबांशी रक्ताचं नातं होतं. त्यानंतरही त्यांनी वेगळा पक्ष का काढला? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला होता. प्रकाश महाजन यांनी भुजबळांना देखील उत्तर दिलं. भुजबळ कोणत्या संदर्भात बोलले हे माहीत नाही. मात्र भुजबळांना अस बोलण्याच काय कारण होतं? भुजबळ विसरले की त्यांनी नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली असली तरी त्यांना स्वतःला नॉलेज नाही.
बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं.राज साहेबांनी कधीही पक्ष फोडण्याचं काम केलं नाही. त्यांचे काही तात्विक मतभेद होते ते बाळासाहेबांना सांगून बाळासाहेबांना विचारून ते बाहेर पडलेले आहे कोणालाही एखाद्या संघटनेतून किंवा पक्षातून बाहेर पडून स्वतः चा विचार रुजविण्याचा हक्क आहे,' असं महाजन यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : आगामी विधानसभेसाठी मनसेचा काय आहे प्लान? या उमेदवारांना राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल )
स्वर्गीय मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेते केल्यानं, तुम्हाला पोटदुखी होती. आता तरी खरं बोला, शिवसेनेत कधीही जाती बघितल्या जात नव्हत्या. त्यामुळे मंडल आयोगाचे कारण पुढे करून ही गोष्ट लपवण्याचे काय कारण होतं? असं महाजन यांनी भुजबळ यांच्या टीकेला उत्तर दिलंय.
विधानसभेची तयारी सुरु
13 तारखेला मनसेचा मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आम्ही कोणाकडेही पंधरा ते वीस जागा मागितल्या नाहीत. आम्ही स्वबळावर 200 जागा लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. 2009 पेक्षा चांगले यश आम्हाला या विधानसभा निवडणुकीत मिळेल याची खात्री आहे, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.