लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून काही विधानसभांच्या उमेदवारांची नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहे. वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय माहिममधून मनसेचे नेते नितीन सरदेसाई निवडणूक लढणार आहेत. याशिवाय राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढणार आहेत.
मनसे नेत्यांकडून या मतदारसंघात कामालाही सुरुवात झाली आहे. मनसे स्वबळावर लढणार की महायुतीसोबत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र काही विधानसभेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार आहेत.
नक्की वाचा - उत्तर प्रदेशात नवा ट्विस्ट, INDIA आघाडीच्या 6 खासदारांवर संकट
दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू असल्याने विधानसभा एकत्र लढवणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. भाजपला महायुतीत असतानाही लोकसभा निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांना भाजपने सोबत घेतल्यामुळे अंतर्गत आणि भाजपच्या मतदारांमध्ये नाराजी पसरल्याचं म्हटलं जात आहे. जर महायुतीने एकत्रित निवडणूक लढवली तर विधानसभेच्या 277 जागा वाटप कसं होणार याबाबतचा सवाल उपस्थित होतो. लोकसभेत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन झालेला वाद पाहता जर राज ठाकरेंही युतीत सामील झाले तर विधानसभेतही जागावाटपाचा मुद्दा अधिक क्लिष्ट होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world