Sandeep Deshpande Interview : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु झाल्या आहे. मंगळवारी रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या भेटीने भाजप आणि ठाकरे गट दोघांचंही टेन्शन वाढलं आहे. त्याआधी संदीप देशपांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत संदीप देशपांडे बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, "विधानसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि मनसे अनेक जागांवर आमने-सामने आले होते. मात्र आम्ही युतीत असतो तर आमच्याही काही जागा निवडून आल्या असत्या आणि शिंदे गटाच्याही काही जागा वाढल्या असत्या. याची आकडेवारी सर्वांसमोर आहे. वरळी, दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी अशा काही जागा आहेत. जर आमची युतीबाबत बोलणी झाली असती, तर दोघांनाही फायदा झाला असता. परंतु दु्र्दैवाने तसं झालं नाही."
(नक्की वाचा- Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!)
"विधानसभा निवडणुकीदरम्यान आमच्यात कम्युनिकेशन गॅप राहिला. जी बोलणी वेळेत व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही अनेक गोष्टी झाल्या. मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा काही गोष्टी टाळून जर काही गोष्टी करता आल्या तर निश्चित प्रयत्न राहील, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. मात्र युती करायची की नाही? युती कुणासोबत करायची याचा निर्णय राज ठाकरे घेतली", असं देखील संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
(नक्की वाचा- Raj Thackeray-Eknath Shinde : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?)
भाजप की शिवसेना? मनसे कुणासोबत?
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, असा सूर अनेक नेत्यांमध्ये पाहायला मिळात आहे. त्यामुळे भाजपने महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला तर राज ठाकरेंच्या मनसेसाठी भाजपपेक्षा शिवसेना शिंदे गटसोबत नैसर्गिक युती ठरू शकते, असं अनेकांचं मत आहे.
अमित ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मदत न केल्याने राज ठाकरे शिंदेवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र उदय सामंत यांनी मध्यस्थी करत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली आहे. उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे ठाकरे सोबत असल्याचा फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. तसेच शिंदेंसोबत हातमिळवणी केल्यास मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी मिळू शकते.