
अमजद खान, कल्याण
शहापूर आणि आजूबाजूच्या परिसराला पावसाने झोडपलं आहे. रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. सततच्या पावसामुळे भारंगी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी शहापूर शहरात शिरलं आहे. त्यामुळे शहापूर शहरील अनेक इमारतींमधील पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं आहे.
इमारतींमधील अनेक वाहन पाण्याखाली आले आहेत. तर काही वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे. पहिल्याच पावसात संपूर्ण शहापुर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने काही साकाव पुराच्या पाण्याखाली गेल्याने अनेक आदिवासी वाड्यांचे संपर्क तुटले आहेत.
जवळपास 150 पर्यटक अडकले
वाशिंद परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिक घरात अडकून पडले होते. वाशिंद परिसरातील सृष्टी फार्म हाऊसमध्ये देखील पाणी साचलं. याठिकाणी फिरायला आलेले जवळपास 150 लोक येथे अडकले होते. एनडीआरएफचे पथकाने सर्व पर्यटकांना फार्म हाऊसमधून बाहेर काढलं.

Shahapur Rain
पनवेलमधील गाढी नदीची पाणीपातळी वाढली
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे गाढी नदी दुथडी भरून वाहत आहे. पनवेल-उरण मार्गांवरील गाढी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल दुपारपासूनन खालापूर, खोपोली, कर्जत, पनवेल, उरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. माथेरान येथे तब्बल 220 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
खडवली नदीला पूर
टिटवाळ्यात मुसळधार पावसामुळे खडवली नदीला पूर आला आहे. खडवलीचा फळेगाव रुंदे मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने पाच ते सहा गावाचा संपर्क तुटला आहे.