- सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर बंदी लावण्यात येणार आहे
- अवैध प्रवासी वाहतुकीसाठी 5 जून ते 15 जून दरम्यान राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे
- या मोहिमेअंतर्गत विभागीय अधिकारी, वाहतूक निरीक्षक आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी संयुक्त तपासणी करणार आहेत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली सर्वांची लाडकी एसटी. ही एसटी नेहमीच तोट्यात असते असं बोललं जातं. त्याला प्रमुख कारण म्हणजे एसटी बस स्थानका बाहेरून होणार अवैध प्रवासी वाहतूक. आता या अवैध प्रवासी वाहतूकीलाच चाप बसणार आहे. सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घातला जाणार आहे. त्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. तसे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ही अवैध वाहतूक रोखली गेल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नात आपोआप भर पडणार आहे.
या मोहिमेअंतर्गत 5 जून ते 15 जून 2026 या कालावधीत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसे परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने जारी केले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे अथवा उतरविणे यावर बंदी राहणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. एसटीच्या उत्पन्नावर परिणाम करणारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बसस्थानक परिसरात अनधिकृत वाहतुकीमुळे निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मोहिमेत विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
संबंधित विभाग प्रमुखांनी संयुक्त पथके स्थापन करून नियमित तपासण्या कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल मुख्यालयास सादर करावा असं ही स्पष्ट करण्यात आलं. सरनाईक यांनी सर्व विभाग नियंत्रक, प्रादेशिक व्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांना या मोहिमेकडे केवळ औपचारिक उपक्रम म्हणून न पाहता ती जनहिताची आणि एसटीच्या हितसंरक्षणाची जबाबदारी म्हणून राबविण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world