'लाडकी बहीण' योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

डोमिसाइलची अट रद्द करणे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. योगेश केदार यांनी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक अडचण ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महत्वाकांक्षी योजना लागू करण्यासाठी जाचक ठरत असलेली डोमिसाइलची अट रद्द करणे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. योगेश केदार यांनी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

(नक्की वाचा- कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ)

योगेश केदार यांनी निवेदनात काय म्हटलं?

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करून आपण अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. जो लाखो महिलांच्या जीवनात योगदान देईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लावलेली डोमिसाईलची अट अतिशय जाचक आहे. हा दाखला काढणे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्र सुद्धा किचकट आहेत. साधारण गाव खेड्यात काम करणाऱ्या महिलांना त्याची जुळवाजुळव करणे मुश्किल आहे. तसेच ते निघायला साधारण 10 ते 15 दिवस जातात. त्यामुळे रहिवाशी दाखला म्हणून तलाठ्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड ग्राह्य धरावे", अशी आग्रही मागणी योगेश केदार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सदर विषयाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे.

या योजनेचा लाभ कोणाला?   

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दिड हजार रूपये जमा होणार आहेत.  

(नक्की वाचा- 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी तलाठी कार्यालये फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद)

अर्ज कुठे आणि कसा करायचा? 

ज्या पात्र महिला आहेत त्याना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल. योजनेचे अर्ज पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करता येईल. अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला अर्जा सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आवश्य लागणार आहेत. त्याच बरोबर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण पणे विनामुल्य असेल. शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे.