Mumbai Heavy Rain Reason: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. अनेक भागांत सलग होत असलेल्या या मुसळधार पावसाचे मुख्य कारण आता समोर आले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता 'तीव्र अवदाब'मध्ये (Low-Pressure Area) रूपांतर झाले आहे. या हवामान प्रणालीची तीव्रता कमालीची वाढल्यामुळेच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील काही दिवस धोक्याचे; पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या सक्रिय हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
(नक्की वाचा: Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद; रेल्वे वाहतूकही विस्कळीत)
वेगवान वारे आणि ढगांची दाटी
हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या हवामान प्रणालीमध्ये वाऱ्याचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितिही अधिक होते. त्यामुळे मान्सूनची स्थिती सध्या चांगली आहे.
मुंबई, पुणे, ठाणे पालघरमध्ये शाळांना सुटी
मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघरमध्ये सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (6 जुलै) सर्व सरकारी, खासगी तसेच महानगरपालिकेच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) रविवारी (5 जुलै) संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे, ज्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाव्यतिरिक्त वेगवान वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवला आहे.
(नक्की वाचा: Railway News: दरडीचा फटका! मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद, 'या' 16 एक्सप्रेस रद्द; वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर)
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर कोसळली दरड
आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचे आवाहन
सरकारी आणि खासगी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील तसेच नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. 30 जूनपासून आतापर्यंत या घटनांमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट जारी केल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (6 जुलै) जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.