मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा कालपासून प्रवाशांसाठी खुला झाला. इतका मोठा रस्ता खुला झाल्याने एकीकडे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे संभ्रमाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. कारण कोस्टल रोडवरुन एक रस्ता वरळीला आणि दुसरा रस्ता हाजी अलीकडे जातो. मात्र प्रशासनाने साईन बोर्डवर दिलेली नावे प्रवाशांमध्ये इतकी परिचयाची नसल्याने नेमकं जायचं कुठे यावरुन प्रवाशांमध्ये संभ्रम होत होता.
एनडीटीव्ही मराठीने नागरिकांची हीच समस्या लक्षात घेत, या बोर्डबाबतची बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत हाजी अली आणि वरळीकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी नवीन बोर्ड आता प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत.
(वाचा- ही वाट दूर जाते, पण कुठे? कोस्टल रोड खुला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वाहनांचा 'स्पीड' कमी)
जुना दिशादर्शक फलक
काय बदल करण्यात आला?
कोस्टल रोडवर वरळी नाका आणि हाजी अली येथे जाण्यासाठी बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक अशी नावे देण्यात आली होती. मात्र वरळी आणि हाजी अली अशी नावं दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. रस्ता चुकू नये म्हणून प्रवासी जंक्शनवर गाड्यांचा वेग कमी करुन विचारपूस करताना दिसत होते.
(वाचा - VIRAL VIDEO: अटल सेतूवर मनोरुग्णाचा नग्नावस्थेत धिंगाणा, टोल कर्मचारी मेटाकुटीस)
नवीन दिशादर्शक फलक
एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर या समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक यासोबतच आता तिथे हाजीअली, ताडदेव आणि वरळी नाका, एअरपोर्ट असे साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचा संभ्रम दूर होऊन प्रवास वेगाने होण्यास मदत होणार आहे.