Mumbai News: मुंबई शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले की, मुंबईत आता भुयारी मार्गांचे एक मोठे जाळे तयार केले जाणार आहे. ज्यामुळे वाहतुकीला एक समांतर रस्ते प्रणाली उपलब्ध होईल. त्यांनी मिश्किलपणे या योजनेला 'पाताल लोक' असे नाव दिले, जो शब्द एका प्रसिद्ध हिंदी वेब सीरिजमुळे लोकप्रिय झाला आहे. आयआयएमयूएन (IIMUN - India's International Movement to Unite Nations) च्या 'युथ कनेक्ट' सत्रात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेची माहिती दिली.
पश्चिम एक्स्प्रेस हायवेला समांतर मार्ग
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईतील 60% वाहतूक ही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर चालते. मात्र येथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. वाहतुकीची कोंडी पूर्णपणे दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे 'पाताल लोक' जाळे तयार केले जात आहे. हे जाळे सध्याच्या रस्त्यांचे एक शॅडो नेटवर्क म्हणून काम करेल. या नवीन समांतर रस्त्यांवर वाहनांचा सरासरी वेग 80 किमी प्रति तासअसेल. मेट्रो कॉरिडॉरचा विस्तार या योजनेला पूरक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
कोणते भुयारी प्रकल्प सुरु आहेत?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर जोडणी सुधारण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांची यादी दिली.
- ठाणे-बोरीवली बोगदा - यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट जोडली जातील.
- मुलुंड-गोरेगाव बोगदा- यामुळे पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सुधारेल.
- बोरीवली ते गोरेगाव समांतर रस्ता- हा देखील वाहतुकीला मोठा दिलासा देईल.
अटल सेतू ते गिरगाव चौपाटी कनेक्टर
- वरळी-शिवडी कनेक्टर- अटल सेतूवरून वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत प्रसास सोपा करण्यासाठी हा कनेक्टर पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
- अटल सेतू ते गिरगाव- ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे अटल सेतूला गिरगाव चौपाटीशी जोडणारा बोगदा 3 वर्षांत पूर्ण होईल, ज्यामुळे सद्यस्थितीतील वाहतूक जामवर तोडगा निघेल.
- वांद्रे ते बीकेसी - वांद्रे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंतच्या प्रस्तावित बोगद्यामुळे देशांतर्गत विमानतळावर पोहोचणे सोपे होईल. दक्षिण मुंबईतून विमानतळावर 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होईल.
(नक्की वाचा- दिवाळीला स्कूटर भेट अन् 50,000 रुपये बोनस; प्रसिद्ध इन्फ्लूएन्सरच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून चकीत व्हाल!)
मुंबई वन ॲप प्रवाशांसाठी दिलासा
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हटलं की, उपनगरीय रेल्वेने दररोज सुमारे 90 लाख लोक प्रवास करतात. एवढे बदल होत असतानाही, सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये एक रुपयाचीही वाढ होणार नाही. तसेच, सर्व उपनगरीय सेवा टप्प्याटप्प्याने वातानुकूलित होतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.