मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) आजपासून दोन दिवस चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. कोलाडजवळ नवीन पुलाच्या गर्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांना अडचणी येऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची सोय करून देण्यात आली आहे.
कोलाड जवळील पूई येथे नवीन पुलाचं काम सध्या सुरू आहे. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. आज आणि उद्या या दोन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी बारा ते सायंकाळी चार या कालावधीत हे ब्लॉक असणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाशांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.
गेल्या 12 वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रूंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पुलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलाडजवळील पूई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम 18 आणि 19 जुलै दरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आणण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Rain Update : पुन्हा पाऊस सैराट; आज सकाळपासून मुंबई, कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात
गर्डर बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीही पुलाजवळ दाखल झाल्या आहेत. हे काम करतांना वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतूक महासंचालकांकडे यासंदर्भात विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक विभाग अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.
पर्यायी मार्ग कोणते…
-वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.
-वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.
-या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग ला पुढे जाता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world