Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या पुरुषांची आता खैर नाही, कारण खुद्द खासदारांनीच सुरक्षा दलाला 'फ्री हॅण्ड' दिला आहे. "महिला डब्यात एखादा पुरुष दिसला तर हात जोडू नका, थेट झोडपून काढा," असा बेधडक सल्ला भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) अधिकाऱ्यांना दिला आहे. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हात जोडणं सोडा, हिसका दाखवा
बदलापूर रेल्वे स्थानकात नुकतीच खासदार बाळ्या मामा यांनी आरपीएफ जवानांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. अनेकदा महिला डब्यात पुरुष घुसतात, आरपीएफ त्यांना फक्त समज देऊन सोडून देते. मात्र, आता तसं चालणार नाही, असं खासदारांनी ठणकावून सांगितलं. "केवळ समज देऊन हे लोक ऐकणार नाहीत, त्यांना कायद्याचा आणि खाकीचा धाक दाखवा, तरच महिला डब्यातील घुसखोरी थांबेल," असे आदेशच त्यांनी यावेळी दिले.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये भररस्त्यात नेमकं काय घडलं? एका बाटलीसाठी हॉटेल चालकावर तुटून पडले नशेखोर, पाहा VIDEO )
मुंबई लोकलमधील महिलांची डोकेदुखी
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेमध्ये महिला डब्यात पुरुषांनी शिरकाव करणे ही एक जुनी आणि गंभीर समस्या आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी अनेक पुरुष, मद्यपी आणि नशेखोर तरुण महिला डब्यात घुसतात. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक तक्रारी करूनही हा प्रकार थांबत नसल्याने आता खासदारांनी थेट 'ऑन द स्पॉट' कारवाईची भाषा केली आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
खासदारांनी आरपीएफ अधिकाऱ्यांशी संवाद साधतानाचा हा व्हिडिओ सध्या फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. महिला प्रवाशांकडून या भूमिकेचे स्वागत केले जात आहे, तर दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत राहून अशी मारहाण करणे योग्य आहे का, असा सवालही काही वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. मात्र, बाळ्या मामा यांच्या या टोकदार सल्ल्यामुळे रेल्वे प्रशासनावर आता कारवाईचा मोठा दबाव निर्माण झाला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: खोट्या कागदपत्रांचा डोंगर आणि 7 मजली इमारत;डोंबिवलीत बिल्डरच्या अटकेनंतर 100 कुटुंब संकटात )
मध्य रेल्वेच्या मार्गावर मद्यपी आणि नशेखोरांचा वावर वाढल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरपीएफ आणि जीआरपीने संयुक्तपणे गस्त वाढवावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंड आकारण्याऐवजी त्यांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. खासदारांच्या या सल्ल्यानंतर आता रेल्वे पोलीस महिला डब्यातील घुसखोरांविरुद्ध नेमकी काय मोहीम राबवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इथे पाहा संपूर्ण Video
Badlapur Station Viral Video: "समज देऊ नका, थेट बदडा!"; महिला डब्यातील घुसखोरांवरून भिवंडीचे खासदार बाळ्या मामांचा आरपीएफला थेट दम?#ndtvmarathi #BalyaMama #BhivandiMP #BadlapurStation #WomenSecurity #MumbaiLocal #CentralRailway #ViralVideo #RPFIndia #PoliticalNewsMarathi… pic.twitter.com/AykkjOcK11
— NDTV Marathi (@NDTVMarathi) May 30, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world