मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमधून उतरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर (Malad Station Stabbing) शनिवारी संध्याकाळी घडली. विलेपार्ले येथील प्रसिद्ध 'नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स' (NM College) मधील 33 वर्षीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आलोक सिंह (NM College Teacher Killed) यांची एका सहप्रवाशाने चाकू भोसकून हत्या केली.
नरसी मोनजी कॉलेजच्या प्राध्यापकाची हत्या
आलोक सिंह (Alok Singh Murder) हे एनएम कॉलेजमध्ये गणित आणि सांख्यिकी (Maths & Statistics) विषयाचे शिक्षक होते. शनिवारी संध्याकाळी त्यांनी विलेपार्ले स्थानकातून बोरीवलीच्या दिशेने (Borivali Local News) जाणारी लोकल पकडली होती. संध्याकाळची वेळ असल्याने ट्रेनमध्ये मोठी गर्दी होती. 6.30 च्या सुमारास ट्रेन मालाड स्थानकात पोहोचली असता, आलोक सिंह यांना खाली उतरायचे होते. गर्दीतून बाहेर पडताना त्यांचा एका अज्ञात सहप्रवाशाशी धक्का लागल्याने वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने आलोक यांना पोटात भोसकले. या हल्ल्यामुळे आलोक सिंह जागीच कोसळले होते. या घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. रेल्वे पोलिसांनी जखमी आलोक यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एका नामांकित कॉलेजच्या तरुण शिक्षकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने शैक्षणिक वर्तुळात आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्हीत दिसला आरोपी
सीसीटीव्हीच्या आधारे तपास रेल्वे पोलिसांनी (GRP) याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. मालाड रेल्वे स्थानकावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. मुंबई लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, एका छोट्याशा वादातून कुणाचा जीव घेतला जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world