Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमधील गर्दी ही काही नवी गोष्ट नाही. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी काही ठाराविक तास लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. कामाच्या ठिकाणी 'लेटमार्क' लागू नये म्हणून हजारो मुंबईकर या लोकलमधून अगदी 'जीवाजी बाजी' लावून प्रवास करत असतात. त्यामध्ये अनेकदा जीवघेणे अपघात झाले आहेत. तरीही जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची मुंबईकरांची सवय सुटत नाही.धावत्या लोकलच्या दारात लटकून प्रवास करताना एका महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे.
दिवा ते मुंब्रा दरम्यानचा या अत्यंत भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रवासादरम्यान या महिलेची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला थेट घासली. अवघ्या काही सेकंदांचा आणि इंचाचा फरक राहिल्यामुळे एक मोठा आणि भीषण अपघात टळला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल असाच आहे.
अंगावर काटा आणणारा थरारक प्रवास
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिवा-सीएसएमटी लोकलच्या दारात प्रचंड गर्दी दिसून येत आहे. या गर्दीमुळे एका महिलेला ट्रेनच्या बाहेर लोंबकळत प्रवास करावा लागत होता. लोकल वेगाने धावत असतानाच रस्त्यातील एका पुलाचा खांब अत्यंत जवळून गेला. त्यावेळी या महिलेची साडी थेट त्या खांबाला घासली गेली. सुदैवाने महिलेचा हात सुटला नाही आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र ही घटना पाहून उपस्थित प्रवासी चांगलेच घाबरले होते.
( नक्की वाचा : Amravati News : 'मठात पत्नीसारखे ठेवले, भक्तांना लुटले', भोंदुबाबाच्या काळ्या चेहऱ्यानं अमरावती हादरले )
मुंबई आणि ठाणे परिसरातील लोकल ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. यामुळे अनेक प्रवाशांना दारात लटकून जीवघेणा प्रवास करावा लागतो. यापूर्वीही दारात लटकून प्रवास करताना खाली पडून अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
( नक्की वाचा : Pune News: पुणे शहरात जड वाहनांना नो-एन्ट्री! मुंबई, सोलापूरसह प्रमुख महामार्गांचे रूट बदलले, वाचा सविस्तर )
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दारात लटकून किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. प्रवासी सुरक्षेबाबत रेल्वे कडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांना नाईलाजाने असा धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
MumbaiLocal | Viral Video | लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा जीव थोडक्यात बचावला#Mumbai #LocalTrain #Diva #CSMT #CentralRailway #ViralVideo #CommuterSafety #CrowdManagement #Alert pic.twitter.com/LhTHByHVRx
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 20, 2026
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, तो केवळ पाहण्यासाठी नसून धोकादायक प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक गंभीर इशारा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world