
Mumbai Marriage Registration : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता शनिवार आणि रविवार, दोन्ही दिवशी विवाह नोंदणी करण्याची सुविधा सुरू केली आहे. 'वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस' (Weekend Marriage Registration Service) या नावाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सोमवार ते शुक्रवार 'फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस' (Fast-track Marriage Registration Service) देखील उपलब्ध असेल. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणीच्या दिवशीच विवाह प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
काय होणार फायदे?
नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या अनेक जोडप्यांना विवाह नोंदणीसाठी कामकाजाच्या दिवशी सुट्टी घ्यावी लागत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी बीएमसीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, प्रशासकीय कामकाजात सुलभता आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने ही सेवा सुरू केली आहे.
( नक्की वाचा : BMC News : मुंबईत ‘खड्डेमुक्त' रस्त्यांचे काम कुठवर आले? आता एका क्लिकवर कळणार सर्व माहिती )
फास्ट ट्रॅक आणि वीकएन्ड सेवा
1. वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस (Weekend Marriage Registration Service)
- ही सेवा शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी सकाळी 9 ते दुपारी १ या वेळेत उपलब्ध असेल. या सेवेसाठी नियमित शुल्कासोबत 2,500/- रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
- दर शनिवारी: ए, सी, ई, एफ दक्षिण, जी दक्षिण, एच पूर्व, के पूर्व, पी दक्षिण, पी उत्तर, आर मध्य, एल, एम पश्चिम आणि एस या 13 विभाग कार्यालयांमध्ये ही सेवा मिळेल.
- दर रविवारी: बी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, एच पश्चिम, के पश्चिम, पी पूर्व, आर दक्षिण, आर उत्तर, एन, एम पूर्व आणि टी या 12 विभाग कार्यालयांमध्ये विवाह नोंदणी करता येईल.
2. फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस (Fast-track Marriage Registration Service)
ही सेवा सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवसांमध्ये उपलब्ध असेल. प्रत्येक विभाग कार्यालयातील दररोजच्या 30 विवाह नोंदणी कोट्यापैकी 20 टक्के, म्हणजेच 6 नोंदणी 'फास्ट ट्रॅक' सेवेसाठी राखीव असतील. या सेवेसाठी नियमित शुल्क आणि 2,500/- रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. या दोन्ही सेवा रविवार, 21 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहेत.
विवाह नोंदणीची गरज आणि प्रमाण
उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या माहितीनुसार, बीएमसीमध्ये वर्षाला सुमारे 30,000 ते 35,000 विवाहांची नोंदणी होते. मात्र, विवाह प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज असून अनेक शासकीय कामांसाठी ते आवश्यक असते. वेळेच्या अडचणीमुळे अनेक जोडपी नोंदणी करत नाहीत, असे प्रशासनाच्या लक्षात आले होते. त्यामुळे या नव्या सेवांमुळे विवाह नोंदणीचे प्रमाण वाढेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
या दोन्ही नवीन सेवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी (public holidays) उपलब्ध नसतील. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी याबाबतची माहिती दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world