Mumbai Metro : मुंबई मेट्रो 3 च्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 31 ऑगस्टपासून रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो सकाळी 6.30 वाजल्यापासून धावणार आहे, ज्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच, गणेशोत्सवासाठी रात्रीच्या सेवेतही वाढ करण्यात आली आहे.
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो 3 मार्गिकेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRCL) रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो 3 ची सेवा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना सकाळी 8.30 ऐवजी 6.30 वाजल्यापासून प्रवासाला सुरुवात करता येणार आहे.
(नक्की वाचा- Thane Metro ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं?)
सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवर सोमवार ते शनिवार सकाळी 6.30 ते रात्री 10.30 या वेळेत मेट्रो धावते. मात्र, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ही सेवा सकाळी 8.30 वाजता सुरू होते. अनेक प्रवाशांना सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर प्रवास करण्याची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी MMRCL ने 31 ऑगस्टपासून रविवारीही मेट्रो 6.30 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
(नक्की वाचा : ठाण्याजवळ उभारला जाणार सर्वात मोठे मेट्रो डेपो, वाचा संपूर्ण माहिती )
गणेशोत्सवासाठी रात्रीची सेवा वाढवली
गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन, 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात मेट्रो 3 च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मेट्रो उपलब्ध असेल आणि प्रवाशांना सोयीस्कर होईल. 7 सप्टेंबरपासून मात्र नियमित वेळेनुसार म्हणजेच सकाळी 6.30 ते रात्री 10.30 या वेळेतच मेट्रो सेवा सुरू राहील.