देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता आणखी फास्ट होणार आहे. मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावरील मेट्रो 3 मार्गातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवार 5 ऑक्टोबर) रोजी या मार्गाचं लोकार्पण झालं. मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे. त्यामुळे याची मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे. शहराच्या वर्दळीच्या भागातून ही मेट्रो जाणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांची ट्रॅफिक जाम आणि लोकलच्या गर्दीतून सुटका होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
मुंबई मेट्रो 3 चा मार्ग काय आहे? कोणता मार्ग पहिल्या टप्प्यात सुरु होतोय? त्यामध्ये काय सुविधा आहेत? त्याचं तिकीट काय? ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या मार्गाचं लोकार्पण ?
आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं आहे. पहिल्या टप्प्यात 12.44 किलो मीटरच्या अंतरावर मेट्रो धावणार आहे. यामध्ये 10 स्टेशन असून यातील नऊ स्थानके ही अंडर ग्राउंड आहेत तर 1 स्थानक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहेत.
किती झाला खर्च ?
2011 मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा प्रकल्प पूर्णत्वास आला मेट्रो कारशेडचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. 22 हेक्टर जागेवर ते साकारले आहे. आज मेट्रो-3 प्रकल्पाची किंमत 36 हजार कोटी झाली आहे. आरेमधील कारशेडला झालेला विरोध त्या भोवतीच्या राजकारणामुळे मेट्रोची किंमत वाढली.