Mumbai Metro : मुंबईतील पहिली आणि सर्वात व्यस्त असलेली वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रवाशांच्या गर्दीमुळे सतत चर्चेत असते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता चार डब्यांच्या सध्याच्या गाड्या सहा डब्यांच्या करण्याच्या योजनेला प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर पुन्हा एकदा गती मिळाली आहे. आगामी BMC निवडणुका जवळ आल्यामुळे या अत्यंत आवश्यक असलेल्या बदलाला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे गर्दीच्या वेळी या मार्गावरील प्रवाशांच्या गर्दीचा ताण कमी होण्याची शक्यता आहे. सहा डब्यांची मेट्रो धावल्यास प्रवासी वाहतूक क्षमता वाढेल. जेणेकरून प्रवसांना मोठा दिलासा मिळू शकतो. मिड-डे वृत्तपत्राने याबाबतची वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Pune News: रिंग रोडच्या नियोजनासाठी MSRDC ला हवीत पुण्यातील ही 74 गावं, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता)
सहा डब्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू
या मार्गावर अतिरिक्त कोच आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या निविदेमध्ये सध्याच्या रोलिंग स्टॉकसोबत टप्प्याटप्प्याने गाड्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी कोणतीही निश्चित वेळेची मर्यादा अद्याप ठरलेली नाही.
मेट्रो लाईन 1 ची रचना सार्वजनिक-खाजगी भागीदारी या तत्त्वावर आधारित असल्यामुळे, हा प्रकल्प अनेक वर्षांपासून खर्च, भाडे आणि जबाबदाऱ्यांवरून सुरू असलेल्या वादविवादांमध्ये अडकला होता. आता सहा डब्यांमध्ये रूपांतरण करताना सध्याच्या अनेक कंत्राटांचा समावेश, रोलिंग स्टॉकचा पुरवठा, डेपोची क्षमता, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे आणि सिग्नलिंग सिस्टीममध्ये आवश्यक बदल करणे, अशा अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
(नक्की वाचा- Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड)
प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी हे बदल टप्प्याटप्प्याने केले जातील. सुरुवातीला मर्यादित संख्येत सहा डब्यांच्या गाड्या धावतील. मुंबईकरांना गर्दीतून कधी दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.